दर पाच मिनिटांनी सरकार घेतंय मोबाईलचा स्क्रीनशॉट Pudhari File Photo
विश्वसंचार

दर पाच मिनिटांनी सरकार घेतंय मोबाईलचा स्क्रीनशॉट

उत्तर कोरियामध्ये स्मार्ट फोनवर सरकारची नजर

पुढारी वृत्तसेवा

प्याँगयांग : सध्या जगात अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच हुकूमशाही असलेले देश आहेत. याच देशांपैकी एक म्हणजे उत्तर कोरिया! या देशातील हुकूमशाह किम जोंग उनच्या करामतींमुळे तो जगभरामध्ये (कु)प्रसिद्ध आहे. आता किम जोंग उनचा असाच एक नवा कारनामा बाहेर आला आहे. उत्तर कोरियामधील जनतेचे स्मार्ट फोन आता सरकारद्वारे नियंत्रित करण्यात येत असल्याचे ‘बीबीसी’ने अगदी पुराव्यासहीत जगासमोर आणले आहे. तेथील सरकार दर पाच मिनिटांनी नागरिकांच्या मोबाईलचा स्क्रिनशॉट घेत आहे. या नव्या नियमामुळे उत्तर कोरियामधील लोकांना देशाबाहेरील कोणतीही माहिती प्राप्त करता येत नाही किंवा स्वतःच्या स्मार्ट फोनचा खासगी वापर करता येत नाही, हे स्पष्ट झाले आहे.

देशातील सर्व फोनमध्ये फेरफार

उत्तर कोरियातील दैनंदिन जीवन आणि प्रत्येक माहितीसंदर्भात फार काटेकोर सेन्सॉरशिप लावली जाते. त्यामुळेच बीबीसीने तस्करीच्या माध्यमातून उत्तर कोरियातील स्मार्ट फोन मिळवला आणि त्याची तपासणी केली. या स्मार्ट फोनमधील अँड्रॉईडचे कस्टमाईज व्हर्जन वापरले जाते. त्यामुळे या फोनमध्ये फक्त स्थानिक इंटरनेटशीच फोन कनेक्ट होतो. या इंटरनेटच्या माध्यमातून उत्तर कोरिया सरकारला जी आणि जेवढी माहिती दाखवायची आहे, तीच यूझर्सला पुरविली जाते. सदर स्मार्ट फोनचे विश्लेषण करताना एक धक्कादायक बाब समोर आली. ती म्हणजे, या स्मार्ट फोनद्वारे गुप्तपणे दर पाच मिनिटांनी स्क्रिनशॉट घेतला जातो. हे स्क्रिनशॉट एका गुप्त फोल्डरमध्ये सेव्ह केले जातात. फोनच्या यूझरला हे स्क्रीनशॉट दिसत नाहीत; मात्र सरकारी यंत्रणा हे स्क्रीनशॉट पाहू शकतात. स्मार्ट फोनशी छेडछाड झाली किंवा बाहेरच्या देशातील माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला, तर तो गुन्हा मानला जाईल, असे सरकारने यापूर्वीच जाहीर केले आहे.

काही शब्द टाईपच होत नाहीत

एवढेच नाही, तर एखाद्याला फोनवर काही संदेश टाईप करायचा असेल, तर सरकारला जी भाषा अपेक्षित आहे, ती आपोआप रेकमेंड केली जाते. उदाहरणार्थ, उत्तर कोरियामधील स्मार्ट फोनवर एखाद्याने कट्टर शत्रू असलेल्या दक्षिण कोरिया या देशाचे नाव टाईप केले, तर तो शब्द आपोआप उत्तर कोरियाच्या अजेंड्यानुसार ‘पपेट स्टेट’ (कळसूत्री बाहुली देश) असा होतो. उत्तर कोरिया सरकारने अधिकृतपणे शेजारच्या राष्ट्रासाठी हाच शब्द वापरण्याची भूमिका घेतली असून ती या स्मार्ट फोनच्या माध्यमातूनही राबवली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT