टोकियो : सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओने चांगलाच धुमाकूळ घातला आहे, जो पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. जपानमधील एका प्राणी संग्रहालयात राहणाऱ्या १३ वर्षांच्या 'कियोमासा' नावाच्या नर गोरिलाची ६२ सेकंदांची क्लिप इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. 'RT'च्या रिपोर्टनुसार, आपल्या फिमेल पार्टनरसोबत (मादी गोरिला) एका छोट्याशा कारणावरून कियोमासाची जोरदार हुज्जत झाली. या भांडणानंतर कियोमासाने जी प्रतिक्रिया दिली, त्याने जगभरातील नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.
प्राणी संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये हा एक छोटासा मतभेद होता; परंतु कियोमासाने ही गोष्ट भलतीच मनावर लावून घेतली! भांडण संपल्यानंतर कियोमासा पिंजऱ्यात असलेल्या सिमेंटच्या पायऱ्यांवर जाऊन गपचूप एकटाच बसला. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, तो एखाद्या मोठ्या धक्क्यात किंवा विचारात बुडालेला आहे. सर्वात मजेशीर बाब म्हणजे, त्याने माणसांप्रमाणे स्वतःच्या हनुवटीवर हात ठेवला आहे, ठीक तसाच, जसा एखादा माणूस आयुष्यातील मोठ्या निर्णयांबद्दल विचार करतो किंवा एखादा तत्त्वज्ञ सखोल विचारांमध्ये हरवून जातो! तो वारंवार आपले डोके खाजवत आहे, हात एकमेकांत गुंफत आहे आणि शून्यात पाहत आहे.
कियोमासाची ही माणसासारखी शैली पाहून इंटरनेट युजर्सनी त्याची चांगलीच फिरकी घेतली आहे. लोक या व्हिडीओवर मजेशीर कमेंटस् करत आहेत: एक युजर म्हणाला : ‘‘हे तर अगदी 'मॅरेज स्टोरी' सिनेमातल्या भांडणासारखं वाटतंय. जिथे भाऊ अजूनही विचार करतोय की माझ्याकडून नक्की काय चूक झाली, आणि त्याची बायको मात्र पुढं निघूनही गेलीय!’’ दुसरा युजर लिहितो : ‘‘हा गोरिला त्याच्या डोक्यात ते अख्खं भांडण पुन्हा 'रिप्ले' करून पाहतोय आणि विचार करतोय की, शेवटी मी असं काय वाईट बोललो जेणेकरून ती एवढी रागावली?’’ अनेक युजर्सनी तर त्याला 'गोरिलियो द फिलॉसॉफर' असे नावही देऊन टाकले आहे. गोरिला हे मानवाचे सर्वात जवळचे नातेवाईक मानले जातात आणि त्यांचा सुमारे ९८ टक्के डीएनए माणसांशी जुळतो. ते अत्यंत सामाजिक प्राणी आहेत आणि माणसांप्रमाणेच राग, दुःख, हळवेपणा, प्रेम आणि पश्चात्ताप यांसारख्या भावना अनुभवू शकतात.