कॅलिफोर्निया : कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे जगभरात डेटा सेंटर्सची गरज वेगाने वाढत आहे. अमेरिकेतील ग्रामीण भागांत अशा प्रकल्पांना स्थानिक नागरिकांचा कडाडून विरोध होत आहे. पाणी आणि विजेचा प्रचंड वापर तसेच पर्यावरणावरील ताणामुळे नागरिक नाराज आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी आता दिग्गज टेक कंपन्यांनी थेट अंतराळात डेटा सेंटर्स उभारण्याची चाचणी सुरू केली आहे. गुगलने यासाठी ‘प्रोजेक्ट सनकॅचर'अंतर्गत आपला पहिला प्रायोगिक उपग्रह अवकाशात पाठवला आहे.
कॅलिफोर्नियातील व्हँडेनबर्ग स्पेस फोर्स बेसमधून स्पेसएक्सच्या ‘फाल्कन ९’ रॉकेटद्वारे गुगलचा हा उपग्रह अवकाशात झेपावला. गुगलच्या विशेष ‘टेन्सर प्रोसेसिंग युनिट’ चिप्स अंतराळातील अत्यंत कठीण वातावरणात, तीव्र रेडिएशनमध्ये कशा काम करतात, हे तपासणे या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. २०२७ मध्ये गुगल आणखी दोन उपग्रह पाठवणार असून त्यांद्वारे लेझर कम्युनिकेशनची चाचणी घेतली जाईल.
खर्च आणि हार्डवेअर अपग्रेडचे प्रश्न कायम
डेटा सेंटर्स अवकाशात पाठवणे कितपत किफायतशीर ठरेल, याबाबत तज्ज्ञांमध्ये शंका आहे. एआय चिप्सचे तंत्रज्ञान दर १-२ वर्षांनी बदलते, तर उपग्रहांचे आयुष्य ५ ते ७ वर्षे असते. त्यामुळे जुने हार्डवेअर बदलणे अंतराळात अत्यंत खर्चिक ठरेल. स्पेसएक्ससारख्या कंपन्याही या शर्यतीत असून, गुगलच्या मते हा दीर्घकालीन संशोधनाचा भाग आे. भविष्यात हे तंत्रज्ञान कितपत यशस्वी ठरते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
उष्णता, रेडिएशन आणि ट्रॅफिकची मोठी आव्हाने
अवकाशात डेटा सेंटर्स चालवणे वाटते तितके सोपे नाही. पृथ्वीवर डेटा सेंटर्स थंड ठेवण्यासाठी पाण्याचा किंवा हवेचा वापर सहज करता येतो. मात्र, अवकाशातील पोकळीत उष्णता बाहेर टाकणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. सध्याचा चाचणी उपग्रह जास्त गरम होऊ नये म्हणून दर २० मिनिटांनी बंद करावा लागणार आहे. याशिवाय तीव्र रेडिएशनमुळे डेटा खराब होण्याचा धोका असतो, तसेच अंतराळातील वाढत्या उपग्रहांच्या गर्दीमुळे अपघातांची शक्यताही बळावते.