वॉशिंग्टन : सध्या तंत्रज्ञान अत्यंत वेगाने प्रगती करत आहे. 'एआय' म्हणजेच 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'मुळे तर नवी क्रांतीच घडत आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात जग बरंच पुढे जात असतानाच गुगल, अॅपलसारख्या कंपन्यांकडूनही नवनवीन तंत्रज्ञान नवनवीन रूपात जगासमोर आणले जात आहे. त्यामधीलच 'गुगल आयओ' (Google I/O 2024) इवेंटची सध्या सर्वदूर चर्चा सुरू असून, त्या इवेंटमध्ये 'एआय'ने विशेष लक्ष वेधले. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीच या कार्यक्रमाची सुरुवात 'जेमिनी'संदर्भातील चर्चेनं केली. आपण काही गोष्टी विसरू शकतो, पण 'गुगल'चे नवे टूल ते न विसरता हरवलेल्या वस्तूही शोधून देऊ शकते.
गुगलच्या या मेगाइवेंटमध्ये 'एआय'पासून गुगलचं व्हिडीओ जनरेटीव्ह एआय मॉडेल 'व्हिओ' लाँच केले. याशिवाय इतरही काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या. कंपनीकडून या इवेंटमध्ये 'प्रोजेक्ट अॅस्ट्रा' सुद्धा लाँच केले. गुगलच्या या नव्या प्रोजेक्टअंतर्गत भविष्यातील एआय असिस्टंट तयार करण्यासाठी केला जाईल. गुगलचं हे नवं फिचर साधारण, 'ओपन एआय' आणि 'जीपीटी 4' सारखेच असून, तुमच्या मोबाईल कॅमेरामध्ये दिसणार्या प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीची सविस्तर माहिती हे टूल देणार आहे. गुगलचे हे असिस्टंट टूल कॅमेर्यामध्ये दिसणार्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून भविष्यात तो डेटा गरज पडल्यास वापरताना दिसणार आहे. याचे एक प्रात्यक्षिक गुगलच्या या इवेंटमध्येही दाखवण्यात आलं. जिथं एआय टूल कॅमेरामध्ये दिसणार्या प्रत्येक गोष्टीसंदर्भात सविस्तर माहिती देत होतं.
हे असिस्टंस टूल कोड वाचून त्यासंदर्भातील माहितीही देण्यास सक्षम असून, तुमच्या आजूबाजूच्या परिसरासंदर्भातील माहिती देण्याचं कामही हे टूल करतं. अॅस्ट्राला तुम्ही कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारू शकता. असे हे कमाल फिचर सर्वसामान्य गुगल युजरपर्यंत येण्यासाठी काहीसा विलंब लागणार असला तरीही त्याचे काही फिचर्स जेमिनी अॅपवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे एखाद्या गोष्टीचा फोटो या मोबाईल कॅमेर्यातून टिपण्यात आला आहे आणि त्याच फोटोमध्ये असणारी एखादी गोष्ट तुम्ही शोधताय किंवा अनावधानाने तुम्हाला तिचा विसर पडला आहे, तर गुगलचे हे टूल तुम्हाला त्याची माहितीही देणार आहे. थोडक्यात 'गुगल'चे हे टूल म्हणजे तंत्रज्ञानाचा नवा टप्पाच आहे, असे म्हणणे गैर ठरणार नाही.