कॅलिफोर्निया; वृत्तसंस्था : भ्रामक माहिती आणि खोट्या फोटोंचा वाढता धोका लक्षात घेता, ‘गूगल’ या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनीने आपल्या ‘गूगल अर्थ’ या प्लॅटफॉर्मवरील नवीन ‘एआय’ इमेज जनरेटर टूल तात्पुरते मागे घेतले आहे. बीबीसी व्हेरिफायच्या एका विशेष तपासणी अहवालानंतर तज्ज्ञांनी या टूलच्या गैरवापराबाबत आणि समाजात गैरसमज पसरवण्याच्या क्षमतेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली होती.
गूगलने आपल्या ‘नॅनो बनाना २’ या एआय इमेज जनरेटरचा गूगल अर्थमध्ये समावेश केल्याची घोषणा केली होती. मात्र, ही सुविधा सुरू झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांच्या आतच गूगलला ती स्थगित करावी लागली. कंपनीने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘काही वापरकर्ते धोरणांचे उल्लंघन करणारे ‘एआय’ फोटोंचे स्क्रीनशॉटस् शेअर करत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. मजबूत सुरक्षा नियम आणि कडक मर्यादा लागू करेपर्यंत आम्ही ही सुविधा थांबवत आहोत.’
या नवीन फीचरच्या मदतीने वापरकर्ते टेक्स्ट प्रॉम्प्टस् (मजकूर) देऊन रिअल-स्टाईल सॅटेलाईट किंवा ३डी इमेजेसवर खोट्या किंवा काल्पनिक घटनांचे चित्रीकरण करू शकत होते. तसेच, हे फोटो डाऊनलोड करून इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करणे शक्य होते.
फ्रान्सचा ऐतिहासिक ‘आयफेल टॉवर’ कोसळल्याचे, इजिप्तच्या पिरामिडजवळ मोठा खड्डा पडल्याचे आणि युक्रेनच्या राजधानीत रशियन टँक्स फिरतानाचे अत्यंत वास्तववादी दिसणारे खोटे सॅटेलाईट फोटो काही सेकंदात तयार झाले. एआय तज्ज्ञ हेन्क व्हॅन एस यांनी इशारा दिला की, ‘गूगल अर्थ हा जगभरात अत्यंत विश्वासार्ह प्लॅटफॉर्म मानला जातो. एखाद्या खोट्या फोटोला जेव्हा खऱ्या उपग्रह नकाशाचे आणि अक्षांशांचे अधिष्ठान मिळते, तेव्हा लोक त्यावर सहज विश्वास ठेवतात. यामुळे युद्धजन्य परिस्थिती किंवा संकटाच्या काळात मोठी दिशाभूल होऊ शकते.’
सुरक्षेचे दावे पडले तोकडे
गूगलने असा दावा केला होता की, त्यांच्या टूलद्वारे बनवलेल्या फोटोंमध्ये अदृश्य ‘वॉटरमार्क’ असतात आणि ‘गूगल लेन्स’द्वारे ते ओळखता येतात. परंतु, तज्ज्ञांनी सिद्ध केले की या सुरक्षा कवचाला सहज वळसा घातला जाऊ शकतो. युद्धाच्या किंवा संकटाच्या काळात पत्रकारांसाठी आणि नागरिकांसाठी सॅटेलाईट नकाशे हा विश्वासाचा स्रोत मानला जातो. मात्र, अशा खोट्या फोटोंमुळे या विश्वासाला तडे जाण्याची भीती भौगोलिक विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.