कर्नाल : हरियाणातील कर्नाल येथील कौटिल्य पंडित हा ‘गुगल बॉय’ म्हणून ओळखला जातो. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी जगभरातील देशांची राजधानी, चलन, लोकसंख्या आणि भौगोलिक माहिती लक्षात ठेवून त्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. आता त्याच्या यशाच्या यादीत आणखी एक मोठी भर पडली आहे. केवळ 17 वर्षांचा कौटिल्य आता इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात भौतिकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेणार आहे. कौटिल्यला 25 लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे.
कौटिल्यने नुकतेच जीडी गोएंका स्कूलमधून 12 वी उत्तीर्ण केली आहे. त्याला ऑगस्टमध्येच ऑक्सफर्डच्या बॅलिओल कॉलेजकडून प्रवेशाची ऑफर मिळाली असून ऑक्टोबरपासून त्याचे शिक्षण सुरू होईल. तो कॉस्मॉलॉजी, प्लाझ्मा फिजिक्स, डार्क मॅटर, पार्टिकल थिअरी आणि एआय फॉर ह्युमॅनिटी या विषयांवर संशोधन करणार आहे. ऑक्सफर्डमध्ये प्रवेशाबद्दल बोलताना कौटिल्य म्हणाला की, मी जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एकामध्ये शिक्षण घेणार आहे, याबद्दल मला खूप आनंद आहे.
भौतिकशास्त्र सुरुवातीपासूनच माझा आवडता विषय आहे. पुढे मला मानवतेसाठी या विषयात संशोधन करायचे आहे. कौटिल्यचे वडील सतीश पंडित यांनी सांगितले, मुलं चांगले करतात तेव्हा पालक सर्वात आनंदी असतात. आम्हाला आशा आहे की, कौटिल्य त्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर देश आणि मानवतेची सेवा करेल. दरम्यान, आई सुमित शर्मा यांनी भावनिक प्रतिक्रिया देताना सांगितले की, कौटिल्य लहानपणापासूनच जिज्ञासू होता. त्याने प्रत्येकाला प्रश्न विचारून आपली माहिती वाढवली. आज त्याने घेतलेली झेप आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. तथापि, कौटिल्यची बहीण दीक्षा पंडितने सांगितले की, भाऊ ऑक्सफर्ड विद्यापीठात जाणार आहे ही आमच्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याचे लक्ष्य लहानपणापासूनच ठरलेले होते आणि आता त्याच्या स्वप्नांना खर्या अर्थाने दिशा मिळाली आहे.