Kenya Gold Rush | केनियातील ‘या’ गावात सोने शोधण्यासाठी गर्दी! 
विश्वसंचार

Kenya Gold Rush | केनियातील ‘या’ गावात सोने शोधण्यासाठी गर्दी!

पुढारी वृत्तसेवा

नैरोबी : जगाच्या पाठीवर ‘गोल्ड रश’ कुठे व कशी सुरू होईल हे काही सांगता येत नाही. एका मेंढपाळामुळे हजारो लोक सोनं शोधण्यासाठी एका ठिकाणी गोळा झाल्याचा विचित्र प्रकार पश्चिम केनियामधील एका दुर्गम भागातील गावामध्ये समोर आला आहे. इथं सोनं सापडेल या आशेने रोज हजारो लोक या ठिकाणाला भेट देत आहेत.

केनियामधील ‘चेपोरर’ या गावात गेल्या काही आठवड्यांत बाहेरून आलेल्या लोकांची मोठी गर्दी झाली आहे. एकेकाळी केवळ झुडुपे आणि कुरणांनी व्यापलेल्या या परिसरात आता खड्डे, मातीचे ढिगारे आणि कुदळ-फावड्यांच्या मदतीने खडकाळ जमीन खोदणारे लोकच दिसतात. काही आठवड्यांपूर्वी येथे ३३ वर्षीय मन्से लोमाचार या मेंढपाळाला सुमारे तीन ग्रॅम सोने सापडल्यानंतर इथं सोन्याच्या शोधात येणाऱ्या लोकांची गर्दी वाढल्याचे मानले जाते.

हा मेंढपाळ आपली हरवलेली मेंढी शोधत असताना त्याला योगायोगाने हे सोने आढळले. लोमाचारने हे सोने ३६ हजार केनियन शिलिंगला (सुमारे २८० डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार २६,८०० रुपयांना) विकले. लोमाचारला मिळालेले सोने आणि त्यातून झालेल्या कमाईची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यामुळे अधिक लोक चेपोरर गावात येऊ लागल्याचं सांगितलं जात आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, एका वेळी ही गर्दी तब्बल दहा हजार लोकांपर्यंत पोहोचली होती. सोने न सापडल्यामुळे काही लोक निघून गेल्याने आता ही संख्या सुमारे अडीच हजारांवर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT