वॉशिंग्टन/लंडन : अंतराळातून एक अशी बातमी समोर आली आहे, जी ऐकून कोणाचेही डोळे विस्फारतील. अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ एका अशा लघुग्रहाचा अभ्यास करत आहे, जो पूर्णपणे मौल्यवान धातूंनी बनलेला आहे. ‘16 सायकी’ असे या लघुग्रहाचे नाव असून, तो सोने, प्लॅटिनम, लोह आणि निकेलचा अथांग साठा असल्याचे मानले जात आहे. आंतरराष्ट्रीय विज्ञान अहवालांनुसार, या लघुग्रहावरील खजिन्याची किंमत इतकी आहे की, जर ते सर्व पृथ्वीवर आणले, तर जगातील प्रत्येक व्यक्ती करोडपती होऊ शकते.
नेमका काय आहे हा खजिना?
बहुतेक लघुग्रह खडक किंवा बर्फाने बनलेले असतात; परंतु ‘16 सायकी’ हा प्रामुख्याने धातूंचा बनलेला आहे. यात लोह, निकेलसह मोठ्या प्रमाणात सोने आणि प्लॅटिनम असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. या लघुग्रहाची एकूण अंदाजित किंमत 10,000 क्वाड्रिलियन डॉलर्स (म्हणजेच 1 वर 19 शून्य इतके रुपये) इतकी सांगितली जाते. ही किंमत जगाच्या एकूण अर्थव्यवस्थेपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे.
16 सायकी’ हा लघुग्रह मंगळ आणि गुरू ग्रहांच्या दरम्यान असलेल्या एस्टेरॉईड बेल्टमध्ये सूर्याभोवती फिरत आहे. ‘नासा’ने 13 ऑक्टोबर 2023 रोजी या लघुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी एक विशेष अंतराळयान प्रक्षेपित केले आहे. हे यान 2029 पर्यंत ‘16 सायकी’जवळ पोहोचेल. शास्त्रज्ञांना असे वाटते की, हा लघुग्रह एखाद्या प्राचीन ग्रहाचा गाभा असावा. याचा अभ्यास केल्याने पृथ्वीसारख्या ग्रहांची निर्मिती कशी झाली, हे समजण्यास मदत होईल.
सोने पृथ्वीवर येणार का?
‘नासा’ने स्पष्ट केले आहे की, ही मोहीम केवळ वैज्ञानिक संशोधनासाठी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात धातू पृथ्वीवर आणण्याचे तंत्रज्ञान सध्या उपलब्ध नाही आणि जर ते आणले, तर पृथ्वीवरील सोन्याची किंमत मातीमोलाची होईल.