Mexico's El Mencho | मेक्सिकोच्या ड्रग्ज माफियाच्या अंत्ययात्रेत सोन्याची शवपेटी आणि पाच ट्रक फुले! 
विश्वसंचार

Mexico's El Mencho | मेक्सिकोच्या ड्रग्ज माफियाच्या अंत्ययात्रेत सोन्याची शवपेटी आणि पाच ट्रक फुले!

पुढारी वृत्तसेवा

ग्वाडलाहारा (मेक्सिको) : मेक्सिकोच्या रस्त्यांवरील मृतदेहांचा खच, जळणारी वाहने आणि हवेत पसरलेली दहशतीची शांतता एकाच गोष्टीची साक्ष देत आहे, ‘जलिस्को कार्टेल’च्या साम्राज्याचा सूर्य मावळला आहे. अमेरिकेने ज्याच्यावर कोट्यवधींचे बक्षीस ठेवले होते, तो कुख्यात ड्रग्ज माफिया ‘एल मेंचो’ अखेर काळाच्या पडद्याआड गेला आहे. सोमवारी जेव्हा त्याची अंत्ययात्रा निघाली, तेव्हा त्याचे वैभव पाहून संपूर्ण जग थक्क झाले. एल मेंचोचा अंत्यविधी एखाद्या राजाप्रमाणे पार पडला. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा मृतदेह लाकडी पेटीत नाही, तर चक्क सोन्याच्या शवपेटीत ठेवण्यात आला होता. त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी इतकी फुले आली होती की ती स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी 5 मोठे ट्रक लागले!

एल मेंचोला ‘कॉक फायटिंग’ (कोंबड्यांच्या झुंजी) बघण्याचा प्रचंड शौक होता. त्यामुळे अंत्यसंस्काराच्या ठिकाणी फुलांपासून बनवलेली एका मोठ्या कोंबड्याची प्रतिकृती ठेवण्यात आली होती. अंत्ययात्रेत बँड-पथकासह त्याचे गुणगान गाणारी गाणी आणि स्थानिक ‘ड्रग बॅलडस्’ वाजवण्यात आली. 59 वर्षीय एल मेंचोचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मेक्सिकोच्या स्पेशल सिक्युरिटी फोर्सने त्याला पकडण्यासाठी धाड टाकली होती. यावेळी त्याच्या अंगरक्षकांशी झालेल्या भीषण चकमकीत तो गंभीर जखमी झाला होता. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर मेक्सिकोतील अनेक भागांत हिंसाचार उसळला असून, अनेक ठिकाणी वाहने जाळण्यात आली आहेत.

मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लाउडिया शेनबाउम यांच्यासाठी ही मोठी यशप्राप्ती मानली जात असली, तरी सुरक्षा यंत्रणांसाठी हा डोकेदुखीचा विषय ठरत आहे. ‘एल मेंचो’च्या निधनामुळे रिकाम्या झालेल्या या ‘ड्रग्ज साम्राज्या’च्या गादीवर बसण्यासाठी आता कार्टेलच्या अंतर्गत गटांमध्येच भीषण टोळीयुद्ध सुरू होण्याची शक्यता आहे. ग्वाडलाहारा येथे झालेल्या अंत्यसंस्कारावेळी ‘मेक्सिकन नॅशनल गार्ड’चे हजारो जवान तैनात होते. अंत्यसंस्काराला आलेले अनेक लोक आपली ओळख लपवण्यासाठी मास्क लावून होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सोन्याची पेटी आणि फुलांचा एवढा डामडौल असूनही, त्याचे थडगे मात्र इतर ड्रग्ज माफियांच्या तुलनेत अत्यंत साधे बनवण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT