Gold and Silver Treasure Discovered | सौदी अरेबियात सापडला सोन्या-चांदीचा खजिना 
विश्वसंचार

Gold and Silver Treasure Discovered | सौदी अरेबियात सापडला सोन्या-चांदीचा खजिना

पुढारी वृत्तसेवा

रियाध: सौदी अरेबियातील पुरातत्त्व शास्त्रज्ञांना एका उत्खननादरम्यान सोन्या-चांदीचे दागिने आणि मौल्यवान रत्नांनी भरलेले मातीचे भांडे सापडले आहे. हा खजिना तब्बल एक हजार वर्षांपेक्षा जास्त जुना असून, मक्केला जाणार्‍या एखाद्या मुस्लिम यात्रेकरूने तो येथे लपवून ठेवला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. ज्या ऐतिहासिक ठिकाणी हा शोध लागला, त्यावरून पुरातत्वशास्त्रज्ञांनी या दागिन्यांच्या साठ्याला ‘दिरीयाह खजिना’ असे नाव दिले आहे.

सौदी हेरिटेज कमिशनच्या पुरातत्त्व शास्त्रज्ञांची टीम गेल्या सहा वर्षांपासून रियाधच्या वेशीवर असलेल्या ‘दिरीयाह’ या भागात उत्खनन करत आहे. हे ठिकाण इराकमधील बसरा आणि सौदी अरेबियातील मक्का दरम्यानच्या ‘हज’ यात्रेच्या मार्गावरील एक मुख्य थांबा होते. येथील सेंद्रिय अवशेषांच्या ‘रेडिओकार्बन’ तपासणीवरून असे समोर आले आहे की, हे मुख्य मानवी वास्तव्य इसवी सन 743 ते 753 या काळातील असावे. हा काळ ‘अब्बासीद खिलाफत’च्या सुरुवातीचा काळ होता. नुकत्याच झालेल्या उत्खनन हंगामात संशोधकांना प्लास्टर ऑफ पॅरिसचे पाण्याचे हौद आणि काही निवासी इमारतींच्या भिंती सापडल्या. या इमारतींमध्ये मातीच्या भांड्यांचे आणि काचेचे तुकडे सापडले.

मात्र, एका दफन केलेल्या मातीच्या भांड्यात 100 पेक्षा जास्त दागिन्यांचे तुकडे मिळणे हा संशोधकांसाठी एक मोठा सुखद धक्का होता. ‘सहाव्या हंगामातील हा सर्वात महत्त्वाचा शोध आहे. या ‘दिरीयाह खजिन्यात’ सोन्याचे दागिने, मौल्यवान रत्ने आणि तांब्याचे काही ऑक्सिडाइज्ड तुकडे समाविष्ट आहेत,’ अशी माहिती सौदी हेरिटेज कमिशनच्या प्रयोगशाळा तज्ज्ञांनी दिली. ‘दिरीयाह’ हे ठिकाण प्रामुख्याने 18 व्या शतकातील पहिले सौदी राज्य आणि ‘हाऊस ऑफ सौद’ (सौदी अरेबियाचे सत्ताधारी घराणे)चे मूळ स्थान म्हणून ओळखले जाते. मात्र, या नव्या शोधामुळे याचा इतिहास कितीतरी पटीने जुना असल्याचे सिद्ध झाले आहे. हा खजिना साधारणपणे इसवी सन 750च्या सुमारास गाडला गेला असावा, जेव्हा अब्बासीद राजवट सत्तेवर आली होती (ही राजवट पुढे 1258 मध्ये मंगोलांनी नष्ट केली).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT