अंकारा : जेव्हा जगातील सर्वात जुन्या इमारतीचा उल्लेख होतो, तेव्हा अनेकांच्या डोळ्यांसमोर इजिप्तचे पिरॅमिडस् येतात. मात्र, इतिहास यापेक्षाही खूप जुना आहे. तुर्कीच्या आग्नेय भागात असलेले ‘गोबेकली टेपे’ ही आतापर्यंत शोधली गेलेली जगातील सर्वात जुनी मानवनिर्मित संरचना मानली जाते. याचे वय सुमारे 11,600 वर्षे (9,600 ख्रिस्तपूर्व) असल्याचे सांगितले जाते.
गोबेकली टेपे हे तुर्कीमधील शानलिउरफा शहरापासून साधारण 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या जर्मुश टेकड्यांमध्ये स्थित आहे. स्थानिक भाषेत या नावाचा अर्थ ‘पोटासारखी टेकडी’ असा होतो. हा परिसर अप्पर मेसोपोटेमियाचा भाग आहे, जिथे मानवी संस्कृतीने शेती आणि स्थिर जीवनाकडे पहिले पाऊल टाकले होते. या ठिकाणी आतापर्यंत दगडांचे सुमारे 200 अजस्त्र खांब सापडले आहेत, जे 20 वर्तुळाकार आणि अंडाकृती रचनेत मांडलेले आहेत. हे खांब ‘ढ’ आकाराचे असून, त्यांची उंची 5.5 मीटरपर्यंत आहे. एकेका खांबाचे वजन 7 टनांपेक्षा जास्त आहे. या खांबांवर जंगली प्राणी, विविध चिन्हे आणि मानवी आकृत्यांचे अतिशय सुबक कोरीव नक्षीकाम करण्यात आले आहे. पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या मते, गोबेकली टेपे ही कोणतीही सामान्य इमारत नसून, ते धार्मिक आणि सामाजिक विधींचे केंद्र होते.
विशेष म्हणजे, ज्या काळात मानवाने शेती करायलाही पूर्णपणे सुरुवात केली नव्हती, अशा ‘शिकारी’ समाजाने ही भव्य वास्तू उभारली होती. ‘संघटित धर्म आणि भव्य स्थापत्य हे शेती सुरू होण्यापूर्वीच अस्तित्वात होते,’ हे या वास्तूने सिद्ध केले आहे. मानवी कल्पकता, सुरुवातीचे अभियांत्रिकी कौशल्य आणि सामाजिक संघटनेचे अद्वितीय उदाहरण म्हणून ‘गोबेकली टेपे’ला युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. त्या काळी दगड कापून, ते तासून उभे करण्याची तंत्रे आजच्या आधुनिक विज्ञानासाठीही अचंबित करणारी आहेत. सध्या तुर्की सरकार आणि युनेस्कोच्या देखरेखीखाली या स्थळाचे जतन केले जात आहे. वाढता पर्यटन ओघ आणि परिसरातील विकासकामे यामुळे या प्राचीन वास्तूला धोका निर्माण होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तरीही, मानवी इतिहासातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून हे स्थळ जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे.