वॉशिंग्टन : अमेरिकेत लॉस एंजेलिसमध्ये शेळ्या चरत असल्याचे द़ृश्य सामान्य बनत चाललंय. जंगलातील आगीवर म्हणजेच वणव्यांवर नियंत्रण मिळवण्याचा हा प्राचीन उपाय खरोखरंच कधीतरी आगीच्या मोठ्या आणि भीषण ज्वाला रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल का? लॉस एंजेलिसमधील हे द़ृश्य सामान्य आहे. निरभ्र-स्पष्ट, स्वच्छ निळ्या आकाशाखाली प्रशांत महासागर चमकतोय, नजर जाईल तितक्या दूरवर पसरलेले सोनेरी वाळूचे किनारे आणि एका टेकडीवरून शेळ्यांचा कळप त्या कोट्यवधी डॉलरच्या द़ृश्याचा आनंद लुटतोय. या केवळ शेळ्या नसून कॅलिफोर्नियाच्या जंगलातील आगीविरुद्धच्या लढ्यातील नवीन गुप्त हत्यार आहेत आणि चरण्यासाठी त्यांना राज्यात विविध ठिकाणी सोडण्यात आले आहे.
शेळीपालक मायकेल चोई म्हणतात, 'आम्ही जिथे जातो तिथे त्यांचं खूप सकारात्मक पद्धतीने स्वागत केलं जातं. "मला असं वाटतं ही दोघांसाठीही चांगली गोष्ट आहे." चोई आग रोखण्यासाठी आवश्यक चराई करणार्या शेळ्यांची कंपनी चालवतात. हा त्यांचा कौटुंबिक व्यवसाय आहे. ते शहरातील संस्था, शाळा आणि खासगी ग्राहकांना टेकड्या आणि भूप्रदेशातील खुरटं गवत स्वच्छ करण्यासाठी शेळ्या भाड्याने देतात. कंपनीकडे 700 शेळ्या आहेत आणि त्यांना अलीकडेच मागणी पूर्ण करण्यासाठी शेळ्यांची संख्या वाढवावी लागली. 'मला वाटतं की ही संकल्पना आणि पर्यावरणीय परिणामांबद्दल लोक जागरूक होत आहेत. खुरटं गवत स्वच्छ करण्यासाठी आणि माळरानाचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी कोणत्या पद्धती वापरायच्या आहेत याबद्दल ते अधिक जागरूक झालेत. त्यामुळे निश्चितपणे याला मोठी मागणी आहे आणि दिवसेंदिवस ती वाढतेय', असे ते म्हणाले.
1980 सालापासून कॅलिफोर्निया हे वारंवार जंगलातील मोठमोठ्या आणि विध्वंसक आगीशी लढण्याचं केंद्रस्थान बनलंय.'कॅलफायर' (कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ फॉरेस्ट्री अँड फायर प्रोटेक्शन, राज्य आग नियंत्रक कंपनी) नुसार, 2021 मध्ये कॅलिफोर्नियाला आगीच्या "अभूतपूर्ण" परिस्थितीचा सामना करावा लागला. फक्त एका आगीत 960,000 एकर (3,885 चौ. कि.मी.) पेक्षा जास्त जंगल जळून खाक झालं. अशा गंभीर परिस्थितीत वेळेवर पडणार्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळू शकतो. 2022 मध्ये राज्यातील जंगलातील आगीच्या हंगामाचे वर्णन 'सौम्य' म्हणून करण्यात आलेले – 2.3 दशलक्ष एकर (9,307 चौरस कि.मी.) च्या पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत 300,000 एकर (1,214 चौरस कि.मी.) पेक्षा जास्त जंगल जळून गेलं. हवामानातील बदलामुळे उष्ण, कोरड्या परिस्थितीसारखे घटक आगीचा धोका आणि तीव्रता वाढवण्याची प्रमुख कारणं आहेत, असं संशोधन दाखवतं. परंतु, जमिनीचे योग्य व्यवस्थापन महत्त्वाची भूमिका बजावू शकतं, असेही अभ्यास झालेत. कारण मेलेली झाडे आणि सुकलेल्या झुडुपांची संख्या वाढल्याने मोठ्या आणि गंभीर आगी लागण्यासाठीचे धोकादायक इंधन तयार होत असतं.
पारंपरिक जमीन व्यवस्थापनामध्ये झुडपांना वाढ नियंत्रणात ठेवणं, सुकलेलं सरपण कमी करणं आणि तणनाशक काढून टाकण्यासारखी अंगमेहनतीची कामं केली जात. परंतु, कंपन्या आणि शहर अधिकारी भविष्याच्या द़ृष्टीने अधिक टिकाऊ आणि स्वस्त पद्धती राबवण्याचा प्रयत्न करत आहेत – उदाहरणार्थ शेळ्या. 'कॅलिफोर्निया आणि भूमध्यसागरीय प्रदेशात विशेषतः झुडुपांमुळे शेळ्या अतिशय उपयुक्त आहेत – विशिष्ट प्रकारच्या जबड्यामुळे शेळ्या या कामासाठी सुयोग्य आहेत.' इडाहो विद्यापीठातील इकोलॉजीच्या प्राध्यापक कॅरेन लाँचबॉग यांनी मेंढ्या, शेळ्या आणि गुरं चरण्यासंबंधी विविध अभ्यास केलेत. त्या म्हणतात, 'त्यांची निर्मिती केवळ झुडुपं खाण्यासाठीच झालेली आहे.'इतर प्राण्यांच्या तुलनेत शेळ्यांचं तोंड अरुंद, निमुळतं असतं ज्यामुळे त्या झाडांमधून झुडुपं सहजपणे निवडून काढू शकतात. मागच्या दोन पायावर उभं राहून सरासरी 6.7 फूट (2 मीटर) उंचीवरील पानं खाण्यासाठी त्यांची जीभ आणि जबडा निपुण असतो. 'त्यांच्याकडे संयुगं डिटॉक्सिफाई करण्याची क्षमता देखील असते, त्यामुळे त्या विषारी वनस्पती खाऊ शकतात', असंही लाँचबॉग सांगतात.