फेब्रुवारीमध्ये जागतिक सागरी बर्फात विक्रमी घट Pudhari File Photo
विश्वसंचार

फेब्रुवारीमध्ये जागतिक सागरी बर्फात विक्रमी घट

नवीन आकडेवारीत उघड

पुढारी वृत्तसेवा

लंडन : गेल्या महिन्यात जागतिक स्तरावर सागरी बर्फाचे प्रमाण सर्वात कमी स्तरावर पोहोचले, असे नवीन आकडेवारीत उघड झाले आहे. युरोपियन युनियनच्या कोपरनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिसने जाहीर केलेल्या अहवालानुसार, 1979 पासून सुरू असलेल्या नोंदींपैकी हा सर्वात कमी सागरी बर्फ असलेला फेब्रुवारी महिना ठरला.

सागरी बर्फ म्हणजे गोठलेले खारट पाणी, जे समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे सागरी बर्फाचे प्रमाण सतत घटत आहे. 2025 च्या फेब्रुवारीमध्ये दोन्ही ध्रुवांवर सागरी बर्फाचे प्रमाण अत्यंत कमी नोंदले गेले, ज्यामुळे जागतिक सागरी बर्फ पातळीने नवा नीचांक गाठला, असे कोपरनिकसच्या तज्ज्ञांनी सांगितले. युरोपियन सेंटर फॉर मिडियम-रेंज वेदर फोरकास्टच्या हवामान धोरण प्रमुख सामंथा बर्गेस म्हणाल्या, ‘उष्णतेच्या वाढत्या पातळीचा एक मोठा परिणाम म्हणजे समुद्री बर्फाचे वितळणे. दोन्ही ध—ुवांवरील विक्रमी किंवा जवळपास विक्रमी समुद्री बर्फातील घट ही या समस्येची स्पष्ट खूण आहे.’ सागरी बर्फ गमावल्याने अनेक पर्यावरणीय संकटे ओढवू शकतात. बर्फाळ भागातील वन्यजीव आणि मानवी वस्ती यांच्यासाठी हे मोठे आव्हान ठरू शकते. शिवाय, सागरी बर्फ वितळल्यावर पाण्याखालील गडद समुद्राचा भाग उघडा पडतो, जो सूर्यप्रकाश अधिक प्रमाणात शोषतो. परिणामी, पृथ्वीवर अधिक उष्णता शोषली जाते आणि ग्लोबल वॉर्मिंगचा वेग अजून वाढतो. कोपरनिकस संस्थेच्या मासिक अहवालांनुसार, 2025 च्या जानेवारी महिन्याने आतापर्यंतचा सर्वात उष्ण जानेवारी महिना म्हणून विक्रम नोंदवला. विशेष म्हणजे, पृथ्वी ला नीना या थंड हवामान चक्रात असतानाही, हे तापमान विक्रमी पातळीवर पोहोचले. नवीन अहवालानुसार, फेब्रुवारी 2025 हा नोंदींतील तिसरा सर्वात उष्ण फेब्रुवारी होता. जरी हा महिना सरासरीपेक्षा अधिक उष्ण असला, तरी त्याने पूर्ण विक्रम मोडला नाही. मात्र, गेल्या काही वर्षांत वाढलेली तापमानवाढ आणि समुद्री बर्फाचे कमी प्रमाण ही हवामान बदलांची धोक्याची घंटा आहे, असे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT