Global Biodiversity Threat | जागतिक जैवविविधता धोक्यात 
विश्वसंचार

Global Biodiversity Threat | जागतिक जैवविविधता धोक्यात

मात्र अंगोलात डझनभर नव्या प्रजाती

पुढारी वृत्तसेवा

लिसिमा : एकीकडे संपूर्ण जगात जैवविविधतेचा वेगाने ऱ्हास होत असताना, दुसरीकडे निसर्गाच्या गूढ जंगलांमधून एकामागून एक नव्या प्रजाती समोर येत आहेत. हा एक अद्‌भुत विरोधाभास आहे. दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञ आणि संशोधकांच्या 'द वाइल्डनेस प्रोजेक्ट' या संस्थेने पूर्व अंगोलातील दुर्गम 'लिसिमा पठारावर' केलेल्या 'कसाई लाईफ ऍटलास्' मोहिमेदरम्यान विज्ञानाला आजवर अज्ञात असलेल्या डझनभर नव्या प्रजाती शोधून काढल्या आहेत.

आफ्रिकेतील हा भाग विज्ञानासाठी एक 'ब्लँक स्पॉट' म्हणजेच अनपेक्षित आणि अपरिचित जागा मानला जात होता. काँगो, झांबेझी आणि ओकावांगो सारख्या मोठ्या नद्यांचे हे उगमस्थान आहे. मात्र, अत्यंत दुर्गम भूगोल आणि २००२ पर्यंत चाललेल्या २७ वर्षांच्या भयानक गृहयुद्धामुळे हा परिसर संशोधकांसाठी बंद होता. याच युद्धामुळे आणि जमिनीतील सुरुंगांच्या भीतीमुळे मानवी हस्तक्षेप टळला आणि निसर्गाचे हे वैभव सुरक्षित राहिले.

या मोहिमेत १६ आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या पथकाने तब्बल १०३ प्रकारच्या टोळ आणि पतंगांच्या प्रजातींची नोंद केली, ज्यातील अनेक विज्ञानाला पूर्णपणे नव्या आहेत. यामध्ये सर्वात आकर्षक ठरला तो 'क्राउंड क्रॅब स्पायडर', जो अतिनील प्रकाशात निळा चमकतो! तसेच, विषारी भुंग्याची नक्कल करून स्वतःचे रक्षण करणारा 'लेडीबर्ड ऑर्ब-वेब स्पायडर' आणि कंबोडियाच्या गुहांमध्ये आढळलेला, डोक्यावरील उष्णता संवेदी अंगामुळे अंधारातही भक्षक शोधणा 'पिट व्हायपर' सर्प संशोधकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत. याशिवाय, ५ सेमी लांब सुळे असलेला जगातील सर्वात विषारी 'गॅबून ऍडर' साप, वटवाघळांचे रक्त पिणारी बिनपंखांची माशी आणि पंखांऐवजी पिसे असलेला 'मेनी-प्ल्युम्ड मॉथ' देखील येथे आढळून आला आहे. २०२४ मध्ये याच भागात एका जनुकीयदृष्ट्या वेगळ्या असलेल्या 'घोस्ट एलिफंट'चा शोध लागला होता.

आव्हानात्मक मोहीम आणि संरक्षणाची गरज

या मोहिमेचे नेतृत्व करणारे टेलर यांनी सांगितले की, ऐन पावसाळ्यात चिखलात अडकलेल्या गाड्या, मलेरियाची लागण आणि तांत्रिक बिघाड अशा अनेक अडचणींना तोंड देत शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले. आता मुख्य आव्हान या प्रजातींना वाचवण्याचे आहे. खाणकाम, शेती आणि जंगलातील वणवे यामुळे येथील शुद्ध पाणी आणि जैवविविधता धोक्यात येऊ शकते, असे मोहीम प्रमुख टेलर म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT