डॉमिनिका: समुद्राच्या अथांग आणि गडद काळोखात राहणाऱ्या स्पर्म व्हेल (Sperm Whales) माशांच्या संवादाचा रिअल-टाइममध्ये मागोवा घेणे आता शक्य झाले आहे. वैज्ञानिकांनी एका रोबोटचा (Autonomous Underwater Glider) शोध लावला असून, हा रोबोट व्हेल माशांच्या आवाजाचा पाठलाग करून त्यांच्या हालचाली टिपण्यास सक्षम आहे.
स्पर्म व्हेल आणि त्यांचे संवाद शास्त्र
स्पर्म व्हेल एकमेकांशी संवाद साधण्यासाठी 'क्लिक्स' चा वापर करतात. या आवाजाच्या विशिष्ट पॅटर्नला 'कोडा' असे म्हटले जाते. हे मासे समुद्रात १.६ किमीपेक्षा जास्त खोलीवर जाऊन सुमारे ५० मिनिटे राहू शकतात, ज्यामुळे मानवांना त्यांचे सतत निरीक्षण करणे आजवर कठीण होते.
कसा काम करतो हा रोबोट?
'प्रोजेक्ट सीईटीआय' अंतर्गत तयार करण्यात आलेला हा 'ग्लायडर' रोबोट एखाद्या पक्ष्याप्रमाणे पाण्याखाली संथपणे फिरतो. यात चार हायड्रोफोन्स (पाण्याखालील ध्वनी टिपणारे यंत्र) बसवलेले आहेत. जेव्हा हा रोबोट व्हेल माशांचा 'क्लिक' आवाज ऐकतो, तेव्हा त्यातील सॉफ्टवेअर आवाजाची दिशा ओळखून नेव्हिगेशन सिस्टमला आपोआप वळण्याचे आदेश देते. इतर उपकरणांप्रमाणे हा रोबोट केवळ आवाज रेकॉर्ड करत नाही, तर स्वतः:हून व्हेल माशाचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतो.
प्रोजेक्ट सीईटीआयचे संस्थापक डेव्हिड ग्रुबर यांनी सांगितले की, या तंत्रज्ञानामुळे आपण केवळ व्हेल माशांची थोडीशी झलक पाहण्याऐवजी त्यांच्याशी 'दीर्घकालीन नाते' जोडू शकू. व्हेलची वासरे आपल्या आईकडून आवाजाचे पॅटर्न कसे शिकतात, याचा अभ्यास यामुळे शक्य होईल. जहाजांचा आवाज किंवा मासेमारीमुळे व्हेल माशांच्या संवादात काय बदल होतात, हे शोधणे सोपे जाईल. व्हेल माशांच्या संवेदनशील भागात जहाजांचा वेग कमी करणे किंवा मार्ग बदलणे यांसारखे महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यास यामुळे मदत होईल.
समोरील आव्हानेजरी हे तंत्रज्ञान प्रगत असले तरी, हा रोबोट व्हेल माशाची दिशा सांगू शकतो पण त्याचे अचूक स्थान शोधण्यात अजूनही काही मर्यादा आहेत. तसेच, डेटा पाठवण्यासाठी या रोबोटला दर काही तासांनी समुद्राच्या पृष्ठभागावर यावे लागते. ग्रुबर यांनी सांगितले की, "आम्ही अशी यंत्रणा तयार करत आहोत जी निसर्गातील घडामोडींना स्वतंत्रपणे प्रतिसाद देऊ शकेल. हे संशोधन केवळ संवर्धनासाठीच नाही, तर पृथ्वीवरील दुसऱ्या एका बुद्धिमत्तेला समजून घेण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे."