चिलीमधील महाकाय दुर्बीण उलगडणार अंतराळाची अनेक रहस्ये 
विश्वसंचार

चिलीमधील महाकाय दुर्बीण उलगडणार अंतराळाची अनेक रहस्ये

दुर्बीण 2028 मध्ये कार्यान्वित होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन ः चिलीमध्ये अनेक देशांच्या सहकार्यातून एका महाकाय दुर्बिणीची म्हणजेच वेधशाळेची सध्या उभारणी सुरू आहे. या दुर्बिणीचे नावच ‘एक्स्ट्रीमली लार्ज टेलिस्कोप’ (ईएलटी) असे आहे. ही दुर्बीण किती क्रांतिकारक ठरणार आहे, याचे वर्णन करणे कठीण आहे. ‘ईएलटी’च्या प्राथमिक आरशाचा व्यास तब्बल 39 मीटर असेल. तो याआधीच्या दुर्बिण्यांपेक्षा अनेक पटींनी अधिक प्रकाश गोळा करू शकेल आणि हबल स्पेस टेलिस्कोपपेक्षा 16 पट अधिक तीव— प्रतिमा मिळवून देईल. ही दुर्बीण 2028 मध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. तिच्या साहाय्याने मिळणारे परिणाम अवघ्या एका रात्रीतही मिळू शकतील, असे एका नव्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

‘ईएलटी’ ची सर्वात मोठी क्षमता म्हणजे बाह्यग्रहांच्या (एक्झोप्लॅनेट) वातावरणातील सूक्ष्म घटक टिपण्याची क्षमता. जेव्हा एखादा ग्रह त्याच्या तार्‍यासमोरून जातो, तेव्हा तार्‍याचा काही प्रकाश ग्रहाच्या वातावरणातून पार जातो. त्या प्रकाशाचे विश्लेषण करून आपण त्या ग्रहाच्या वातावरणात कोणते घटक आहेत, उदा. पाण्याची बाष्प, कार्बन डायऑक्साइड, प्राणवायू (ऑक्सिजन) हे शोधू शकतो. याआधी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने काही एक्झोप्लॅनेटच्या वातावरणाचे निरीक्षण केले आहे; मात्र अनेकदा या निरीक्षणांतील डेटा अपुरा असतो. उदाहरणार्थ, ‘जेम्स वेब’ ने ‘ट्रॅपिस्ट-1’ या ग्रह प्रणालीतील ग्रह ‘बी’ आणि ‘सी’ साठी वातावरणाचा शोध घेतला. मात्र, हे ग्रह पूर्णतः वातावरणविहीन आहेत की त्यांचा वातावरणाचा थर खूप पातळ आहे, हे स्पष्ट करता आले नाही. ‘ईएलटी’ची अतिशय उच्च संवेदनशीलता या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर शोधू शकेल. याशिवाय, ‘ईएलटी’ तार्‍याभोवती फिरणार्‍या अशा ग्रहांचेही निरीक्षण करू शकेल, जे आपल्या द़ृष्टीने तार्‍यासमोर जात नाहीत, फक्त त्यांच्या परावर्तित प्रकाशाच्या मदतीने. या नव्या संशोधनात विविध परिस्थितींसाठी ‘ईएलटी’चे संभाव्य परिणाम अनुकरण (सिम्युलेशन) करून पाहण्यात आले. विशेषतः लाल बटू तार्‍यांभोवती फिरणार्‍या ग्रहांवर लक्ष केंद्रित करण्यात आले, कारण असे ग्रह आकाशगंगेत सर्वाधिक प्रमाणात आढळतात. चार वेगवेगळे परिस्थिती अभ्यासण्यात आल्या. पृथ्वीप्रमाणे जलसमृद्ध आणि वनस्पती असलेला ग्रह, सुरुवातीच्या काळातील पृथ्वी, जेव्हा जीवनाचा उगम होत होता, संपूर्ण महासागर वायू रूपात गेलेला ग्रह म्हणजे मंगळ किंवा शुक्रासारखा ग्रह, जीवनासाठी योग्य परंतु अजून जीवसृष्टी नसलेला ग्रह. याशिवाय, संशोधकांनी नेपच्यूनसारख्या मोठ्या ग्रहांचा अभ्यास केला, कारण अशा ग्रहांची वातावरणे अधिक दाट असतात. ‘ईएलटी’च्या साहाय्याने आपण एक्झोप्लॅनेटवरील जीवनाच्या शक्यता अधिक स्पष्टपणे शोधू शकू, हे या संशोधनातून अधोरेखित होते. त्यामुळे भविष्यातील अंतराळ संशोधनात ही दुर्बिणी महत्त्वाची भूमिका बजावेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT