महाकाय बेटेलज्यूस तार्‍याला आहे जोडीदार! Pudhari File Photo
विश्वसंचार

महाकाय बेटेलज्यूस तार्‍याला आहे जोडीदार!

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : रात्रीच्या आकाशातील तेजस्वी तार्‍यांपैकी एक असलेल्या लाल महाकाय तारा ‘बेटेलज्यूस’ याला एक सोबती तारा असल्याचे खगोलशास्त्रज्ञांनी निश्चित केले आहे. या शोधामुळे बेटेलज्यूसच्या दर सहा वर्षांनी होणार्‍या तेजस्वीतेतील बदलाचे रहस्य उलगडण्यास मदत झाली आहे. बेटेलज्युस हा तारा पुढील काही हजार वर्षांत ‘सुपरनोव्हा’ होऊन फुटण्याची शक्यता असल्याने, त्याच्याबद्दलचे हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

बर्‍याच काळापासून बेटेलज्यूससोबत एक सोबती तारा असावा, असा सिद्धांत मांडला जात होता. आता हवाईच्या मौना की पर्वतावरील जेमिनी नॉर्थ दुर्बिणीतून घेतलेल्या विशेष निरीक्षणांमध्ये सूर्याच्या आकाराचा एक सोबती तारा अखेर समोर आला आहे. या सोबती तार्‍याचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञांना एक अनोखी पद्धत वापरावी लागली. त्यांनी दुर्बिणीचा इमेजर केवळ 14 मिलिसेकंदात उघडला आणि बंद केला. ‘बेटेलज्यूसच्या प्रखर प्रकाशामुळे आमचे डिटेक्टर ओव्हरलोड होऊ नयेत, यासाठी हा एकमेव मार्ग होता,’ असे या अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि नासा एम्स रिसर्च सेंटरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ स्टीव्ह हॉवेल यांनी सांगितले.

हे नवीन संशोधन 24 जुलै रोजी ‘अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’मध्ये प्रकाशित झाले आहे. या नव्या तार्‍याच्या शोधामुळे एका मोठ्या रहस्यावरून पडदा उठला आहे: बेटेलज्युस दर सहा वर्षांनी नियमितपणे कमी-जास्त तेजस्वी का होतो? या सोबती तार्‍याच्या अस्तित्वामुळे या चक्राचे स्पष्टीकरण मिळण्यास मदत झाली आहे. हे संशोधन 2024 मधील दोन मॉडेलिंग अभ्यासांवर आधारित आहे, ज्यात बेटेलज्यूसला सोबती असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, हॉवेल यांनी हे देखील स्पष्ट केले की, हा शोध अंतिम मानला जात नाही आणि त्याला अधिक पुष्टीकरणाची आवश्यकता असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT