बँकॉक : थायलंडच्या घनदाट जंगलात एक असे द़ृश्य आहे, जे पाहून क्षणासाठी आपण कोड्यात पडतो. जणू काही तीन महाकाय देवमाशांचे कुटुंब झाडांच्या समुद्रात एकत्र पोहत आहे; पण हे देवमासे जिवंत नसून, कोट्यवधी वर्षांपूर्वी तयार झालेले विशाल खडक आहेत. या अद्भुत नैसर्गिक रचनेला ‘हिन साम वान’ म्हणजेच ‘थ्री व्हेल रॉक’ या नावाने ओळखले जाते.
हे तीन लांब, गोलाकार खडक एखाद्या देवमाशांच्या कुटुंबाप्रमाणे दिसतात, जे झाडांच्या समुद्रात तरंगत आहेत. निसर्गाच्या या अनोख्या कलेमुळे हे ठिकाण जगभरातील पर्यटक आणि निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या खडकांची निर्मिती सुमारे 7.5 कोटी वर्षांपूर्वी झाली आहे. भूगर्भीय हालचालींमुळे आणि लाखो वर्षांपासून वारा व पावसाच्या प्रवाहामुळे झालेल्या झीजेमुळे ईशान्य थायलंडमधील वाळूच्या खडकांना हा अनोखा आकार प्राप्त झाला. खडकांना पडलेल्या नैसर्गिक भेगांमुळे ते अरुंद आणि लांब झाले, ज्यामुळे ते हुबेहूब देवमाशांसारखे दिसू लागले.
‘थ्री व्हेल रॉक’ थायलंड आणि लाओसच्या सीमेजवळ असलेल्या ‘फू सिंग फॉरेस्ट पार्क’ नावाच्या निसर्गरम्य अभयारण्यात वसलेले आहे. या खडकांपर्यंत पोहोचण्यासाठी जंगलातून जाणारे सुंदर ट्रेकिंग ट्रेल्स आहेत. पर्यटक यातील दोन मोठ्या खडकांवर, ज्यांना प्रेमाने ‘आई’ आणि ‘बाबा’ देवमासा म्हटले जाते, त्यांच्यावर पायी चालत जाऊ शकतात. सुरक्षेच्या कारणास्तव, तिसरा आणि सर्वात लहान खडक, म्हणजेच ‘बाळ’ देवमासा, पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. नॅशनल जिओग्राफिकच्या मते, या मोठ्या खडकांच्या पाठीवरून मेकाँग नदी आणि लाओसमधील पक्काडिंग जिल्ह्यातील पर्वतरांगांचे विहंगम द़ृश्य दिसते. हे खडक उंच कड्यावर असल्याने आणि जंगलाच्या वरच्या भागावर पसरलेले असल्याने, ते खरोखरच समुद्रातील जीव असल्याचा भास निर्माण करतात.