Moa bird | महाकाय ’मोआ’ पक्षी पुनरुज्जीवित होणार? Pudhari File Photo
विश्वसंचार

Moa bird | महाकाय ’मोआ’ पक्षी पुनरुज्जीवित होणार?

600 वर्षांपूर्वी मानवी शिकारीमुळे कायमचा नामशेष

पुढारी वृत्तसेवा

वेलिंग्टन : एकेकाळी न्यूझीलंडच्या भूमीवर वावरणारा आणि सुमारे 600 वर्षांपूर्वी मानवी शिकारीमुळे कायमचा नामशेष झालेला महाकाय ‘मोआ’ पक्षी पुन्हा एकदा जिवंत होणार? हा प्रश्न सध्या जगभरातील वैज्ञानिक आणि पर्यावरणप्रेमींच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. अमेरिकेतील टेक्सास-स्थित ‘कोलोसल बायोसायन्सेस’ या बायोटेक कंपनीने हा धाडसी दावा केला असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी त्यांनी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सर पीटर जॅक्सन आणि न्यूझीलंडमधील स्थानिक माओरी जमातींसोबत हातमिळवणी केली आहे.

  • अमेरिकेतील ‘कोलोसल बायोसायन्सेस’ कंपनीचा प्रयत्न

  • ‘लॉर्ड ऑफ द रिंग्स’चे दिग्दर्शक सर पीटर जॅक्सन यांचाही प्रकल्पात सहभाग

  • कंपनीच्या पूर्वीच्या ‘डायर वुल्फ’ प्रकल्पावरून उठलेल्या वादामुळे या योजनेवरही शंका

‘कोलोसल बायोसायन्सेस’ ही कंपनी यापूर्वीही चर्चेत आली होती, जेव्हा त्यांनी 10,000 वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या ‘डायर वुल्फ’ या प्राचीन लांडग्याला पुनरुज्जीवित केल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांच्या या दाव्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. आता त्याच धर्तीवर त्यांनी मोआ पक्ष्याला परत आणण्याची योजना जाहीर केल्याने पुन्हा एकदा वैज्ञानिक आणि सांस्कृतिक वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

काय आहे ‘मोआ’ पुनरुज्जीवन प्रकल्प?

मोआ हा न्यूझीलंडमध्ये आढळणारा, उडू न शकणारा एक विशाल पक्षी होता. त्याची उंची तब्बल 12 फुटांपर्यंत (3.6 मीटर) पोहोचत असे. सुमारे 600 वर्षांपूर्वी माओरी लोकांच्या शिकारीमुळे ही प्रजाती पूर्णपणे नामशेष झाली. आता ‘कोलोसल’ कंपनी जनुकीय अभियांत्रिकीच्या मदतीने या पक्ष्याला पुन्हा अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न करणार आहे. या प्रकल्पाचे समन्वय ‘नगाई ताहू संशोधन केंद्र’ करणार असून, यात पारंपरिक माओरी ज्ञान आणि अत्याधुनिक विज्ञान यांचा संगम साधण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, या प्रकल्पाला काही माओरी जमातींचा विरोध आहे, तर अनेक शास्त्रज्ञांनी याच्या यशस्वीतेबद्दल आणि नैतिकतेबद्दल गंभीर शंका व्यक्त केल्या आहेत.

‘डायर वुल्फ’च्या अनुभवावरून टीका

‘कोलोसल’च्या ‘डायर वुल्फ’ प्रकल्पावर नजर टाकल्यास या टीकेमागील कारण स्पष्ट होते. कंपनीने जनुकीय बदल केलेले राखाडी लांडगे तयार केले आणि त्यांना ‘डायर वुल्फ’ असे नाव दिले. या लांडग्यांमध्ये डायर वुल्फच्या जीनोममधील काही वैशिष्ट्ये, जसे की मोठा आकार आणि पांढरा रंग, आणण्यात आले होते. परंतु, वैज्ञानिकद़ृष्ट्या ते प्राणी ‘डायर वुल्फ’ नसून, जनुकीय बदल केलेले ‘राखाडी लांडगे’च होते.

तज्ज्ञांच्या मते, हीच प्रक्रिया मोआ पक्ष्याच्या बाबतीतही वापरली जाईल. म्हणजेच, मोआच्या जवळच्या जिवंत प्रजातीच्या जनुकीय आराखड्यात बदल करून ‘मोआसारखा’ दिसणारा पक्षी तयार केला जाईल. पण तो खर्‍या अर्थाने ‘मूळ मोआ’ नसेल. शिवाय, लांडग्याच्या तुलनेत मोआ पक्ष्यासाठी योग्य जनुकीय साधर्म्य असलेला जिवंत नातेवाईक शोधणे आणि ही प्रक्रिया पार पाडणे अधिक गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT