टोकियो : वैज्ञानिकांनी एका अशा महाकाय आणि पंख असलेल्या ‘क्रॅकेन’ ऑक्टोपसचा शोध लावला आहे, ज्याची लांबी तब्बल 62 फूट (19 मीटर) पर्यंत असू शकते. ‘क्रिटेशियस’ कालखंडात समुद्रावर राज्य करणारे हे जीव आतापर्यंत शोधले गेलेले सर्वात मोठे ‘अष्ठपृष्ठवंशीय’ प्राणी असू शकतात, असा दावा संशोधकांनी केला आहे.
गुरुवारी ‘सायन्स’ या प्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, या अक्राळविक्राळ ऑक्टोपसच्या जीवाश्म जबड्यांवरून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. या ऑक्टोपसचे जबडे अत्यंत शक्तिशाली होते. त्यावरील खुणांवरून असे दिसते की, ते कडक कवच असलेल्या जीवांना सहज चिरडून खात असत. प्रचंड आकार, बुद्धिमत्ता आणि शक्तिशाली जबड्यांमुळे हे ऑक्टोपस त्या काळातील सागरी अन्नसाखळीत सर्वात वरच्या स्थानी होते.
आतापर्यंत असे मानले जात होते की, क्रिटेशियस कालखंडात (14.5 कोटी ते 6.6 कोटी वर्षांपूर्वी) केवळ मसोसॉरस आणि प्लिसिओसॉरस सारखे पाठीचा कणा असलेले हिंस्र प्राणीच समुद्रावर राज्य करत होते. मात्र, या शोधामुळे हा समज बदलला आहे. जपानच्या होक्काईडो विद्यापीठातील जीवाश्मशास्त्रज्ञ यासुहिरो इबा यांनी सांगितले, ‘हे निष्कर्ष क्रिटेशियस महासागराबद्दलचा आपला द़ृष्टिकोन बदलतात. केवळ मोठे कणा असलेले शिकारीच नाही, तर ऑक्टोपससारखे महाकाय अष्ठपृष्ठवंशीय जीवदेखील अन्नसाखळीच्या शिखरावर होते.’
ऑक्टोपसचे शरीर मऊ असल्याने त्यांचे जीवाश्म सापडणे अत्यंत दुर्मीळ असते. संशोधकांनी जपान आणि व्हँकुव्हर आयलंडमध्ये सापडलेल्या 15 जुन्या जबड्यांच्या जीवाश्मांचे पुन्हा परीक्षण केले. तसेच, अत्याधुनिक ‘डिजिटल फॉसिल-मायनिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करून जपानमध्ये 12 नवीन जीवाश्म शोधून काढले. या अभ्यासातून ऑक्टोपसच्या दोन नवीन प्रजाती समोर आल्या आहेत :
1. नानाईमोटेऊथिस जेलेट्झकी (Nanaimoteuthis jeletzkyi) 2. नानाईमोटेऊथिस हॅगार्टी (Nanaimoteuthis haggarti) यातील N. jeletzkyi चे अवशेष 7.2 कोटी ते 10 कोटी वर्षांपूर्वीचे असून, यामुळे ऑक्टोपसचा ज्ञात इतिहास सुमारे 50 लाख वर्षांनी मागे गेला आहे.