कार्फिलीन (वेल्स) : वेल्सच्या समुद्रकिनाऱ्यावर एका फ्री-डायव्हरला अवाढव्य आकाराची जेलीफिश आढळून आली आहे. हे दृश्य पाहून सुरुवातीला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही, अशी भावना त्याने व्यक्त केली आहे. पेम्ब्रोकशायर येथील २१ वर्षीय पर्यावरण संवर्धनकर्ता (Conservationist) यीस्टिन मॉर्गन याने हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे. मॉर्गन हा सागरी जीवसृष्टीसमोरील धोक्यांबद्दल जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत असतो. वेल्सच्या समुद्रात त्याने पाहिलेली ही पहिलीच ‘लायन्स मॅन’ प्रजातीची जेलीफिश आहे.
मॉर्गन पेम्ब्रोकशायरमधील त्रेफिन बीच जवळ पोहत असताना त्याला पाण्यात काही स्पर्शके (Tentacles) तरंगताना दिसली. मॉर्गनच्या म्हणण्यानुसार, ‘सुरुवातीला ३, मग १० आणि नंतर २० स्पर्शके दिसू लागली. ती संपतच नव्हती. या जेलीफिशचा आकार एखाद्या बस किंवा लहान ट्रेनच्या लांबीएवढा, म्हणजेच साधारण १० ते १५ मीटर (३२ ते ४९ फूट) इतका होता. तिची स्पर्शके तर दृष्टीच्या पलीकडे पसरली होती.’ सुरुवातीला त्याला ही ब्रिटनच्या पाण्यात आढळणारी ‘कंपास जेलीफिश’ वाटली होती. परंतु, तिचा अथांग आकार पाहून ती दुसरीच प्रजाती असल्याचे त्याच्या लक्षात आले. ‘द वाईल्डलाईफ ट्रस्ट’च्या मते, या जेलीफिशला तिच्या लांबच लांब स्पर्शकांमुळे ‘लायन्स मॅन’ (सिंहाची आयाळ) हे नाव मिळाले असून, तिच्यात सिंहासारखे सौंदर्य आणि दंश करण्याची क्षमता आहे.
या जेलीफिशचे मुख्य शरीर ३ मीटरपर्यंत वाढू शकते. परंतु, शिकारीसाठी वापरली जाणारी तिची स्पर्शके ३० ते ३६.५ मीटर (९८ ते ११९ फूट) पेक्षाही लांब असू शकतात. यामुळे हा पृथ्वीवरील सर्वात लांब प्राण्यांपैकी एक ठरतो. ही प्रजाती प्रामुख्याने स्कॉटलंडजवळील थंड पाण्यात मोठ्या प्रमाणावर आढळते. साऊथॅम्प्टन विद्यापीठातील सागरी जीवशास्त्रज्ञ डॉ. कॅथी ल्युकास यांनी सांगितले की, मॉर्गनच्या व्हिडीओमध्ये या प्राण्याची अफाट लांबी स्पष्ट दिसत आहे. या जेलीफिशची स्पर्शके इतकी बारीक आणि लांब असतात की, ती साध्या डोळ्यांनी सहज दिसतही नाहीत. शरीरापासून तुटल्यानंतरही ही स्पर्शके डंख मारू शकतात. ब्रिटनमधील सागरी जीवांमध्ये याचा डंख सर्वात तीव्र आणि वेदनादायी मानला जातो, तरीही तो मानवांसाठी प्राणघातक किंवा धोकादायक नाही, असे डॉ. ल्युकास यांनी स्पष्ट केले.