लंडन : ग्रीनलँडमध्ये जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिमखंड आहे. आता या हिमखंडाला अतिशय मोठ्या आकाराची भेग पडत असून, हा हिमखंड दुभंगण्याचा धोका निर्माण झाला आहे. केवळ पाच वर्षांच्या काळात या हिमखंडामध्ये पडलेली भेग अधिक रुंद आणि खोल झालेली दिसून आली आहे. काही नव्या त्रिमितीय नकाशांच्या साहाय्याने संशोधकांनी या हिमखंडाबाबतची ही धोकादायक माहिती उघड केली आहे. हा हिमखंड पूर्वीच्या अनुमानापेक्षा अधिक वेगाने दुभंगत असल्याचे या नव्या थ्रीडी मॅप्समधून दिसून आले आहे.
या हिमखंडाला अनेक भेगा पडलेल्या आहेत. या भेगांना ‘क्रेवासेस’ असे म्हटले जाते. या हिमखंडाच्या कडांजवळ या भेगा पडलेल्या आहेत. ज्या ठिकाणी या हिमखंडातून बर्फ आणि वितळलेले पाणी समुद्रात सामावते अशा ठिकाणी या भेगा निर्माण झालेल्या आहेत. अशा ठिकाणी जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राच्या पाण्याची वाढलेली उष्णता ग्लेशिअर्सवर परिणाम करते. त्यामुळे हिमखंडाचा बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढून समुद्राच्या पाण्याची पातळीही वाढण्याचा धोका निर्माण होतो. ‘ग्रीनलँड आईसशीट’ या नावाने ओळखल्या जाणार्या या हिमखंडाने ग्रीनलँडच्या एकूण क्षेत्राचा 80 टक्के भाग व्यापलेला आहे. हा हिमखंड 3 किलोमीटर जाडीचा आहे. सध्या जगभरातील समुद्राच्या पाण्याच्या पातळीत जी वाढ होत आहे, त्यामध्ये याच हिमखंडाच्या बर्फ वितळून येणार्या पाण्याने आधीच मोठा स्रोत निर्माण केलेला असल्याचे आढळलेले आहे. 1990 च्या दशकापासून समुद्राच्या पाण्याची पातळी या हिमखंडाच्या वितळण्यामुळे 14 मिलीमीटरने वाढलेली आहे. ब्रिटनच्या दुर्हम युनिव्हर्सिटीतील ग्लेशिओलॉजिस्ट थॉमस चुडले यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. ग्रीनलँड आईसशीट वितळत असल्याने तेथील ग्लेशियरचे पाणी वेगाने उतारांवरून, तसेच दर्यांमधून पुढे वाहू लागले आहे. परिणामी, या आईस शीटमधील भेगा आणखी मोठ्या होत आहेत. या संशोधनासाठी मिनेसोटा युनिव्हर्सिटीतील पोलर जिओस्पेटिअल सेंटरमधील डाटाचाही वापर करण्यात आला. त्यामध्ये हाय-रिझोल्युशन सॅटेलाईट प्रतिमांच्या साहाय्याने बनवलेल्या थ्रीडी मॅप्सचा समावेश आहे. अशा 8 हजार थ्रीडी मॅप्सना एकत्र जोडून चुडले व त्यांच्या सहकार्यांनी या भेगांचा अभ्यास केला. त्यामधून त्यांनी यापूर्वी भेगांची जी निरीक्षणे करण्यात आली होती, त्यांची तुलना नव्या थ्रीडी मॅप्सशी करून या भेगा किती विस्तारल्या आहेत, याबाबतचे हे नवे निष्कर्ष काढले आहेत.