वॉशिंग्टन : एका नवीन अभ्यासानुसार, सुमारे 6.6 कोटी वर्षांपूर्वी डायनासोरचे साम्राज्य संपवणार्या महाकाय लघुग्रहाच्या आघातातून रहस्यमयी निशाचर सरडे (night lizards) वाचले आणि ते आजही त्याच प्रदेशात अस्तित्वात आहेत. ही घटना म्हणजे निसर्गाच्या लवचिकतेचा एक अद्भुत नमुना आहे.
नवीन उत्क्रांतीविषयक विश्लेषणामुळे संशोधकांना असे आढळून आले आहे की, ‘झँतुसिडे’ (Xantusiidae) कुटुंबातील या लहान सरडे, लघुग्रह सध्याच्या मेक्सिकोच्या युकातान द्वीपकल्पावर आदळण्यापूर्वी आणि नंतरही मेक्सिकोच्या आखाताभोवती राहत होते. यामुळे, निशाचर सरडे हा एकमेव ज्ञात भूमीवरील पृष्ठवंशीय प्राण्यांचा गट ठरला आहे, जो आघाताच्या इतक्या जवळ असूनही वाचला आणि आजही त्यांचे वंशज त्याच प्रदेशात राहत आहेत.
डायनासोरच्या विनाशाला कारणीभूत ठरलेला हा लघुग्रह सुमारे 7.5 मैल (12 किलोमीटर) रुंद होता. क्रिटेशियस कालावधीच्या (14.5 कोटी ते 6.6 कोटी वर्षांपूर्वी) शेवटी जेव्हा तो पृथ्वीवर आदळला, तेव्हा त्याने मोठ्या प्रमाणावर विनाश घडवला. या आघातामुळे पृथ्वीवरील बहुतांश जीवसृष्टी संपुष्टात आली. या घटनेला ‘क्रिटेशियस-पॅलिओजीन (K- Pg) सामूहिक विनाश’ म्हणून ओळखले जाते, ज्यात सुमारे 75 टक्के प्रजाती नष्ट झाल्या. तथापि, या महाभयंकर आपत्तीतून निशाचर सरड्यांचे दोन वंश वाचले, विशेष म्हणजे ते आघाताच्या इतके जवळ होते की त्यांनी कदाचित तो प्रलय पाहिला असेल.
येल युनिव्हर्सिटीच्या इकॉलॉजी आणि इव्होल्यूशनरी बायोलॉजी विभागातील डॉक्टरेट उमेदवार आणि या अभ्यासाचे प्रमुख लेखक, चेस ब्राउनस्टाईन यांनी सांगितले की, ‘ते लघुग्रहाच्या आघाताच्या सीमेवरच सर्वत्र पसरलेले असावेत.’ इतक्या मोठ्या विनाशातून हे निशाचर सरडे कसे वाचले? याबद्दल संशोधकांना खात्री नाही, परंतु ब्राऊनस्टाईन यांनी नमूद केले की त्यांची चयापचय क्रिया मंद असते, ज्यामुळे त्यांना वारंवार खाण्याची गरज भासत नसे. या पाली फक्त काही इंच लांबीपर्यंत वाढतात. त्या खूप गुप्तता पाळतात आणि खडकांच्या फटी, दाट वनस्पती किंवा झाडांच्या साली आणि ओंडक्यांखाली अशा विशेष सूक्ष्म अधिवासांमध्ये राहतात.