ब्युनोस आयर्स : 7 कोटी वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीवर डायनासोरचे राज्य होते, तेव्हा त्यांनाही आव्हान देणारा एक महाकाय, मगरीसारखा शिकारी जीव अस्तित्वात होता. अर्जेंटिनामध्ये झालेल्या एका नवीन संशोधनातून या ‘हायपरकार्निव्होर’ म्हणजेच अत्यंत मांसाहारी जीवाचे रहस्य उलगडले आहे, जो त्या काळातील सर्वोच्च शिकारी असण्याची शक्यता आहे.
2020 मध्ये दक्षिण पॅटागोनियाच्या भूमीत संशोधकांना या विलुप्त झालेल्या शिकारी जीवाचा जीवाश्म सापळा सापडला. हा जीव तब्बल 11.5 फूट (3.5 मीटर) लांब आणि सुमारे 550 पाऊंड (250 किलोग्राम) वजनाचा होता. त्याच्या शारीरिक क्षमतेमुळे तो त्या काळातील मोठ्या शिकारींनाही सहज मारू शकत होता. या जीवाचे नाव ‘कोस्टेनसुकस अॅट्रॉक्स’ (Kostensuchus atrox) असे ठेवण्यात आले आहे. हे नाव दोन शब्दांवरून प्रेरित आहे: ‘कोस्टेन’ (Kosten): पॅटागोनियामध्ये वाहणार्या एका शक्तिशाली वार्याचे नाव. ‘सुकस’ (Suchus): इजिप्तमधील मगरीचे डोके असलेल्या ‘सोबेक’ या देवतेचे दुसरे नाव.
‘कोस्टेनसुकस’ हा एक ‘हायपरकार्निव्होर’ होता, म्हणजेच त्याच्या आहारात 70% पेक्षा जास्त वाटा मांसाचा होता. त्याचे रुंद तोंड, मोठे दात आणि मजबूत पुढचे पाय यांवरून असे दिसून येते की, तो दक्षिण अमेरिकेच्या क्रेटेशियस कालखंडातील (145 दशलक्ष ते 66 दशलक्ष वर्षांपूर्वी) मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यास सक्षम होता. हे संशोधन ‘PLOS One’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. अभ्यासाचे मुख्य लेखक आणि अर्जेंटिनाच्या नॅशनल सायंटिफिक अँड टेक्निकल रिसर्च कौन्सिलचे (CONICET) जीवाश्मशास्त्रज्ञ फर्नांडो नोव्हास यांच्या मते, हा शोध डायनासोरच्या जगाबद्दलची आपली समज अधिक व्यापक करतो.