जोहान्सबर्ग : असे म्हटले जाते की केवळ मानव जातीमध्येच नाती-गोती पाळली जातात. मात्र, या मतास आता अनेक ठिकाणी हरताळ फासला जात असल्याचे दिसून येते. कारण माणसामध्ये पण आपल्याच लोकांना देण्यात येत असलेला धोका पाहून मन खिन्न होते. दक्षिण आफ्रिकेतील नॅशनल क्रुगर पार्कमध्ये कॅमेराबद्ध करण्यात आलेली छायाचित्रे आता जगभरात चर्चेचा विषय बनली आहेत.
मगर हा सरपटणारा प्राणी अत्यंत हिंस्त्र समजला जातो. हा भयानक जीव पोटाची खळगी भरण्यासाठी सर्वसामान्यपणे दुसर्या प्राण्यांची शिकार करताना दिसून येतो. मात्र, नॅशनल क्रूगर पार्कमधील घटना काही वेगळेच सांगून जाते. तेथील एका दैत्याकार मगरीने आपल्यापेक्षा आकाराने लहान असलेल्या मगरीला तोंडात पकडले आणि न चावताच अख्खे गिळून टाकले. सुमारे 1200 किलो वजनाच्या महाकाय मगरीने केलेल्या या शिकारीच्या प्रसंगाची छायाचित्रे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. ही मगर फारच भुकेली होती.
यामुळे दुसरी शिकार न मिळाल्याने आपल्या छोट्या भावाचीच शिकार करून आपली भूक शमविली. नेदरलँडमध्ये राहणार्या 69 वर्षीय जॅन बटर या फोटोग्राफरने हा भयानक प्रसंग कॅमेराबद्ध केला आहे. प्रथम या मगरीने लहान मगरीला आपल्या जबड्यात पकडले आणि जिवंतच गिळून टाकले. असा भयावह प्रसंग आजपर्यंत कधीच पाहिला नव्हता, असे जॅनने म्हटले आहे.