Mars black spot growth mystery | मंगळावर 50 वर्षांपासून पसरतोय एक विशाल ‘काळा डाग’ 
विश्वसंचार

Mars black spot growth mystery | मंगळावर 50 वर्षांपासून पसरतोय एक विशाल ‘काळा डाग’

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : लाल ग्रह म्हणून ओळखल्या जाणार्‍या मंगळाच्या पृष्ठभागावर एक महाकाय ‘काळा डाग’ गेल्या 50 वर्षांपासून सातत्याने पसरत असल्याचे नवीन छायाचित्रांमधून समोर आले आहे. एका विशाल विवरामध्ये असलेला हा गडद भाग नेमका का विस्तारत आहे, याबाबत शास्त्रज्ञ अद्याप साशंक आहेत.

हा गडद भाग म्हणजे ज्वालामुखीची राख आणि ‘ऑलिव्हिन’ व ‘पायरोक्सिन’सारख्या ज्वालामुखीय खडकांनी बनलेला जमिनीचा एक तुकडा आहे. लाखो वर्षांपूर्वी जेव्हा मंगळ भौगोलिकद़ृष्ट्या सक्रिय होता, तेव्हा झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून हा भाग तयार झाला होता. हा भाग मंगळाच्या उत्तर गोलार्धातील साधारण 3,300 किलोमीटर रुंद असलेल्या ‘युटोपिया प्लॅनिटिया’ नावाच्या विस्तीर्ण मैदानात स्थित आहे. नासाच्या ‘वायकिंग’ प्रोब्सनी 1976 मध्ये पहिल्यांदा या काळ्या भागाचे छायाचित्र टिपले होते. तेव्हापासून आतापर्यंतच्या फोटोंची तुलना केली असता, हा भाग सभोवतालच्या जमिनीवर वेगाने पसरत असल्याचे दिसते.

युरोपियन स्पेस एजन्सीच्या ‘मार्स एक्सप्रेस’ ऑर्बिटरने 2024 मध्ये घेतलेल्या आणि 15 एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या नवीन फोटोंनी याला दुजोरा दिला आहे. नव्या आकडेवारीनुसार, या डागाची दक्षिण सीमा गेल्या 50 वर्षांत किमान 320 किलोमीटर (200 मैल) दक्षिणेकडे सरकली आहे. याचाच अर्थ, हा गडद प्रदेश दरवर्षी साधारण 6.5 किलोमीटर वेगाने विस्तारत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, या हालचालीमागे मंगळावरील वेगवान वारे कारणीभूत असू शकतात. ‘ईएसए’ (एडअ) ने यावर दोन शक्यता वर्तवल्या आहेत :

1. मंगळावरील वार्‍यांमुळे ही राख एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वाहून नेली जात असावी.

2. किंवा या गडद राखेवर आधी साचलेली पिवळसर रंगाची धूळ वार्‍यामुळे उडून गेल्याने खालचा काळा भाग उघडा पडत असावा. यापैकी नेमके कोणते कारण योग्य आहे, याचे ठोस पुरावे अद्याप मिळालेले नाहीत. हा भाग गेल्या अर्ध्या शतकापासून संशोधकांसाठी आकर्षणाचे केंद्र राहिला आहे. 1976 मध्ये नासाचे ‘वायकिंग 2’ लँडर याच ठिकाणी उतरले होते आणि 1980 पर्यंत तिथे अनेक जैविक प्रयोग करण्यात आले होते. आता या नवीन विस्तारणार्‍या डागामुळे मंगळाच्या हवामानाचा आणि पृष्ठभागाचा अभ्यास करणे शास्त्रज्ञांसाठी अधिक आव्हानात्मक ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT