Antarctica Giant Bird | अंटार्क्टिकाच्या बर्फात दिसला महाकाय ‘पक्षी’ 
विश्वसंचार

Antarctica Giant Bird | अंटार्क्टिकाच्या बर्फात दिसला महाकाय ‘पक्षी’

नासा-इस्रोच्या ‘निसार’ उपग्रहाने टिपले छायाचित्र!

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन / नवी दिल्ली : ‘नासा’ आणि ‘इस्रो’च्या संयुक्त ‘निसार’ (NISAR - Synthetic Aperture Radar) उपग्रहाने पूर्व अंटार्क्टिकाचे एक अत्यंत नेत्रदीपक छायाचित्र टिपले आहे. यामध्ये गोठलेल्या बर्फाळ प्रदेशात पंख पसरलेल्या एका महाकाय पक्ष्यासारखी हुबेहूब आकृती दिसून येत आहे. निसारच्या वैज्ञानिकांनी या रचनेला ‘हमिंगबर्ड’ असे नाव दिले आहे. ही अद्भुत आकृती कोणताही खरा पक्षी नसून, डोंगर, बर्फ आणि आधुनिक रडार तंत्रज्ञानाचा एक अनोखा मिलाफ आहे, ज्याने पृथ्वीच्या गोठलेल्या खंडातील अनेक लपलेली रहस्ये समोर आणली आहेत.

ही आकृती म्हणजे पूर्व अंटार्क्टिकाच्या बर्फाच्या चादरीवरून वर आलेले एक खडकाळ पर्वताचे शिखर आहे, ज्याला वैज्ञानिक भाषेत ‘नुनाटक झातेरजावशिज्जा' म्हटले जाते. बर्फातून बाहेर आलेल्या अशा उघड्या पर्वतशिखरांना ‘नुनाटक' असे म्हणतात. ऑगस्ट २०२५ मध्ये निसारच्या प्रगत L-बँड रडारने टिपलेल्या या छायाचित्रात हे खडकाळ शिखर अंटार्क्टिकाच्या अथांग बर्फाळ प्रदेशातून वर आलेले स्पष्ट दिसत आहे. जेव्हा हिमनद्या ईशान्येकडे समुद्राच्या दिशेने वाहतात, तेव्हा हा उंच पर्वत त्यांच्या मार्गात अडथळा ठरतो. यामुळे या पर्वताच्या सभोवतालच्या प्रवाही बर्फावर प्रचंड दाब निर्माण होतो आणि ही वैशिष्ट्यपूर्ण आकृती तयार होते.

नासा आणि इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, हे छायाचित्र सूर्याच्या प्रकाशाऐवजी मायक्रोवेव्ह सिग्नल्सचा वापर करून घेण्यात आले आहे, ज्यामुळे बर्फाच्या विविध स्तरांमधील फरक ओळखता येतो. सामान्य उपग्रह किंवा कॅमेऱ्यांनी पाहिल्यास हा संपूर्ण भाग फक्त पांढऱ्याशुभ्र बर्फासारखा दिसतो. मात्र, निसारच्या रडार तंत्रज्ञानाने तो वेगवेगळ्या रंगांमध्ये स्पष्ट केला आहे. यातील रंग हे सपाट आणि मऊ पृष्ठभागावरून परावर्तित होऊन परत येणाऱ्या सिग्नल्सना दर्शवतात. तर, पांढरा भाग हा बर्फातील खोल दऱ्या आणि खडबडीत भाग दाखवतो, जिथे रडारच्या लाटा अंतर्गत बर्फाळ रचनेवर आदळून पसरतात. हे छायाचित्र केवळ एक कलाकृती नसून ‘निसार' उपग्रहाच्या अफाट क्षमतेचा पुरावा आहे. ढग, दाट धूर आणि अंटार्क्टिकातील काळोखालाही भेदून पाहण्याच्या क्षमतेमुळे, हा उपग्रह वैज्ञानिकांना हिमनद्यांची हालचाल, बर्फाच्या थरांची स्थिरता आणि हवामान बदलाच्या प्रभावांचा सखोल अभ्यास करण्यास मोलाची मदत करणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT