King Cobra Rescue 
विश्वसंचार

King Cobra Rescue: नेपाळमध्ये पकडला १४ फुटी महाकाय किंग कोब्रा

नेपाळच्या रौतहटमधील या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे

पुढारी वृत्तसेवा

काठमांडू : नेपाळ हा निसर्गाच्या अत्यंत जवळ असलेला देश आहे. येथे जितके सुंदर पर्वत आहेत, तितकेच दाट जंगलही आहे आणि जंगले आहेत तिथे वन्यजीवांचे वास्तव्य असणे स्वाभाविकच आहे. नेपाळच्या रौतहट जिल्ह्यातून नुकतीच एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे, जिथे एक महाकाय किंग कोब्रा आढळला. फणा काढून बसलेल्या आणि वारंवार हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या या अत्यंत विषारी जीवाला पकडणे सोपे नव्हते, पण तिथल्या रेस्क्यू टीमने हे कठीण काम यशस्वी करून दाखवले.

हा थरारक रेस्क्यू करताना अनेकदा जीव धोक्यात आला, पण टीमचे सदस्य दीपक यांनी हार मानली नाही. दीपक हे नेपाळमधील एक अत्यंत प्रसिद्ध सर्पमित्र (स्नेक रेस्क्यूअर) म्हणून ओळखले जातात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, दीपक हे कोब्राची शेपूट पकडून त्याला बाहेर ओढताना दिसत आहेत. परंतु, हा कोब्रा इतका मोठा आणि लांब होता की, तो दुसऱ्या बाजूने थेट फणा काढून सर्पमित्राच्या अंगावर धावून जाऊ लागला. कोब्रा ज्या वेगाने त्यांच्या दिशेने येत होता, ते पाहून तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या काळजाचा ठोका चुकला. नेपाळच्या रौतहटमधील या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

कोब्राला पकडण्याच्या या प्रयत्नात अनेकदा परिस्थिती हाताबाहेर जाता जाता राहिली. कित्येक वेळा तो नाग निसटून पुन्हा त्याच जागी गेला जिथून त्याला बाहेर काढले होते. यादरम्यान त्याने सर्पमित्रावर अनेक जीवघेणे हल्लेही केले. हा सगळा थरार पाहून आजुबाजूला उभी असलेली गर्दी घाबरून मागे हटली. मात्र, दीपक यांनी कमालीचे संयम आणि कौशल्य दाखवत अखेर या महाकाय कोब्राला सुरक्षितपणे रेस्क्यू केले. किंग कोब्रा हा जगातील सर्वात लांब विषारी सर्प आहे. या प्रजातीच्या सापांची सरासरी लांबी सुमारे १३.१ फूट असते.

मात्र, इतिहासात तब्बल १९.२ फूट लांबीच्या कोब्राची नोंद झाली असून, तो अत्यंत विषारी असण्यासोबतच वजनानेही खूप भारी होता. नेपाळमध्ये आता चौदा फुटांच्या किंग कोब्राला पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT