विश्वसंचार

थायलंडजवळ आढळला ‘घोस्ट शार्क’!

Arun Patil

बँकॉक : थायलंडजवळ अंदमान समुद्रात संशोधकांना 'घोस्ट शार्क'ची यापूर्वी कधीही पाहण्यात न आलेली प्रजाती आढळून आली आहे. या माशाचे मोठे डोके, भयावह व बटबटीत डोळे तसेच पिसांसारखे दिसणारे पर त्याला 'भुता'सारखे बनवतात.

हा मासा अतिशय खोल समुद्रात आढळतो. त्याचे शास्त्रीय नाव 'चिमेरा सुपापी' असे आहे. काही अत्यंत प्राचीन काळातील माशांच्या वंशातीलच हे मासे आहेत. ते शार्क आणि रे माशांचे दूरस्थ नातेवाईक आहेत. त्यांच्याबाबतच्या या नव्या संशोधनाची माहिती 'रॅफ्लेस बुलेटिन ऑफ झूलॉजी' मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

कॅलिफोर्नियातील सॅन जोस स्टेट युनिव्हर्सिटीतील पॅसिफिक शार्क रिसर्च सेंटरचे प्राग्रॅम डायरेक्टर आणि या संशोधनाचे मुख्य संशोधक डेव्हीड एबर्ट यांनी याबाबतची माहिती दिली. जगाच्या या भागात चिमेरा मासे हे अत्यंत दुर्मीळ असल्याचे त्यांनी सांगितले. हे मासे पृष्ठभागापासून 500 मीटर खोलीवर आढळतात. अंधार्‍या पाण्यात राहणारे हे मासे खोल समुद्रातील किडे व काही जलचरांना खातात. जगभरात चिमेराच्या 53 ज्ञात प्रजाती आहेत. आता या नव्या प्रजातीमुळे त्यांची संख्या 54 झाली आहे.

SCROLL FOR NEXT