जर्मनीच्या फ्ली मार्केटमध्ये सापडला हिंदी पंचांगाचा कागद! Pudhari File Photo
विश्वसंचार

जर्मनीच्या फ्ली मार्केटमध्ये सापडला हिंदी पंचांगाचा कागद!

हे विशेष पंचांग वाराणसीमध्ये भास्कर प्रेसद्वारे छापले गेले असावे

पुढारी वृत्तसेवा

बर्लिन : कुठली वस्तू कुठे पोहोचेल, हे काही सध्याच्या जमान्यात सांगता येत नाही. एका जर्मन व्यक्तीने अलीकडेच रेडिटवर देवनागरी लिपीतील मजकूर असलेल्या कागदांचे काही फोटो शेअर केले आहेत. हे कागद त्याला हॅम्बर्गमधील एका फ्ली मार्केटमध्ये सापडले. या छायाचित्रांमध्ये हिंदी मजकूर असलेली दोन पिवळसर पाने दिसत आहेत. या वापरकर्त्याने मजकुराचा उगम आणि अर्थ समजून घेण्यासाठी रेडिट समुदायाकडे मदतीची विनंती केली. त्यामुळे अनेक भारतीयांनी यावर प्रतिक्रिया देत, आश्चर्य व्यक्त केले आहे.

या जर्मन व्यक्तीने फ्ली मार्केटमध्ये सापडलेल्या देवनागरी लिपीतील पिवळसर झालेल्या दोन पानांचे फोटो रेडिटवर शेअर केलेल्यावर नेटकर्‍यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली. त्यांनी सबरेडिटमध्ये ही पोस्ट शेअर करत भारतीय वापरकर्त्यांना या मजकुराची ओळख पटवण्यास मदत करण्याची विनंती केली. प्रथमदर्शनी त्यांनी हा मजकूर हिंदी किंवा संस्कृत असावा, असे ओळखले होते. भारतीय रेडिट वापरकर्त्यांनी तत्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला. त्यांनी हा मजकूर पंचांगातील असल्याचे ओळखले. वापरकर्त्यांनी नमूद केले की हे विशेष पंचांग वाराणसीमध्ये भास्कर प्रेसद्वारे छापले गेले असावे, ज्याचे मालक पंडित नवल किशोर भार्गव होते. नवल किशोर भार्गव हे त्या काळातील एक प्रसिद्ध प्रकाशक होते. एका वापरकर्त्याने आपल्या कुटुंबाची माहिती शेअर केली आणि सांगितले, “या प्रेसचे संचालन माझे पूर्वज पंडित नवल किशोर भार्गव यांनी केले होते. ज्यांचा प्रकाशन क्षेत्रात मोठा प्रभाव होता. या नव्या माहितीमुळे प्रभावित झालेल्या जर्मन व्यक्तीने सर्वांचे आभार मानले आणि विचारले की हा दस्तऐवज दुर्मीळ आहे का?.. काही लोकांनी उत्तर दिले की, याला आर्थिक दृष्टिकोनातून मोठे मूल्य नसले तरी त्याला सांस्कृतिक महत्त्व आहे. विशेषतः, हा दस्तऐवज त्याच्या मूळ स्थानापासून इतक्या दूर कसा पोहोचला यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळेच जर्मन व्यक्तीने या पंचांगाचे योग्यरीत्या जतन करण्याचे ठरवले आहे. या दस्तऐवजाच्या घडलेल्या प्रवासाचा आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे तो हे करत आहे, असेही त्याने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT