Designer Babies | आनुवंशिक आजारांवर मात की ‘डिझायनर बेबीज’चा धोका?  
विश्वसंचार

Designer Babies | आनुवंशिक आजारांवर मात की ‘डिझायनर बेबीज’चा धोका?

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : वैद्यकीय जगतात जनुक संपादन (जीन-एडिटींग) तंत्रज्ञान हे सध्या जीवघेण्या आनुवंशिक आजारांवर मात करण्यासाठी एक आशेचा किरण ठरत आहे. सिकलसेल आणि रक्ताच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर याचे यशस्वी प्रयोग झाले आहेत. परंतु, उपचार घेतलेल्या रुग्णांकडून त्यांच्या भावी मुलांमध्ये हे सदोष जनुक संक्रमित होण्याचा धोका कायम असतो. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून 'मानवी भ्रूण जनुक संपादन' हा पर्याय समोर येत आहे, ज्याद्वारे भावी पिढ्यांमध्ये आनुवंशिक आजार जाण्यापासून रोखता येऊ शकते. मात्र, अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक मानल्या गेल्यामुळे जगभरातील ७० हून अधिक देशांमध्ये यावर कायदेशीर बंदी आहे.

आता एका नवीन संशोधनामुळे ही शक्यता पुन्हा जिवंत झाली आहे. शास्त्रज्ञांनी मानवी भ्रूणाच्या डीएनएमध्ये अत्यंत अचूकतेने बदल करण्यात यश मिळवले आहे. पूर्वी वापरले जाणारे 'CRISPR-Cas9' हे तंत्रज्ञान काहीसे ढोबळ होते. त्यामुळे डीएनएमध्ये अनपेक्षित बदल होण्याचा किंवा संपूर्ण क्रोमोसोम (गुणसूत्र) नष्ट होण्याचा मोठा धोका असायचा. २०१८ मध्ये चिनी संशोधक हे जियानकुई यांनी या जुन्या तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील पहिल्या जनुक-संपादित जुळ्या मुलींचा जन्म घडवून आणला होता, ज्यावर जागतिक स्तरावर तीव्र टीका झाली होती.

या तुलनेत 'बेस एडिटिंग' हे नवीन तंत्रज्ञान अत्यंत अचूक मानले जात आहे. हे तंत्रज्ञान मानवी जीनोममधील सुमारे ३ अब्ज बेस पेअर्सपैकी एका विशिष्ट अक्षरामध्ये अचूक बदल करू शकते. केंब्रिज विद्यापीठाच्या प्राध्यापक कॅथी नियाकान आणि कोलंबिया विद्यापीठाचे डीट्रिच एगली यांच्या संशोधनात आयव्हीएफ) दरम्यान संशोधन हेतूने दान केलेल्या मानवी भ्रूणांवर 'बेस एडिटिंग'चा यशस्वी प्रयोग करण्यात आला. या संशोधनामुळे गुणसूत्रांमधील अनपेक्षित त्रुटींचा धोका लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे समोर आले.

अनपेक्षित जनुकीय बदल

हा वैज्ञानिक मार्ग वाटतो तितका सोपा नाही. संशोधनात असे आढळले की काही भ्रूणांमध्ये 'मोझॅसिझम'ची समस्या निर्माण झाली, म्हणजेच इच्छित बदल सर्व पेशींमध्ये समान पद्धतीने झाला नाही. तसेच काही ठिकाणी अनपेक्षित जनुकीय बदल देखील पाहायला मिळाले, जे भविष्यात संपूर्ण शरीरावर दुष्परिणाम करू शकतात. या तांत्रिक अडचणींसोबतच 'डिझायनर बेबीज' संदर्भातील नैतिक प्रश्नही ऐरणीवर आले आहेत. शिकागो विद्यापीठाच्या प्राध्यापक लॉरी झोलोथ यांच्या मते, या तंत्रज्ञानाचा गैरवापर झाल्यास श्रीमंत लोक पैशांच्या बळावर आपल्या मुलांमध्ये कृत्रिमरित्या इच्छित गुणधर्म विकसित करतील, ज्यामुळे समाजात कधीही न भरून निघणारी मोठी असमानता निर्माण होईल.

सहा वर्षांपूर्वी मानवी भ्रूणातील जनुक संपादन अशक्य वाटत होते, पण या संशोधनाने भविष्यात आयव्हीएफ (IVF) भ्रूणांच्या उपचारात्मक जनुक संपादनाची दारे पुन्हा खुली केली आहेत.
प्रा. अमँडर क्लार्क, संचालक, युसीएलए सेंटर फॉर रिप्रोडक्टिव्ह सायन्स

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT