लंडन : बॅड कोलेस्टेरॉलची समस्या हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानली जाते. शरीरात ‘एलडीएल’ चे प्रमाण वाढल्यामुळे हृदयविकाराचा धोका अनेक पटीने वाढतो. अशा परिस्थितीत वैज्ञानिक जगतातून एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या एका नवीन ‘जीन थेरपी’मुळे आता रुग्णांना रोज औषध खाण्याची गरज भासणार नाही आणि प्रदीर्घ काळासाठी बॅड कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवता येईल.
एका प्रसिद्ध मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, ‘व्हर्व 102’ नावाच्या नवीन जीन थेरपीमुळे बॅड कोलेस्टेरॉल लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. या अभ्यासानुसार, या थेरपीच्या मदतीने बॅड कोलेस्टेरॉल तब्बल 62 टक्क्यांपर्यंत कमी केले जाऊ शकते. शास्त्रज्ञांनी सांगितले की, ज्या रुग्णांना या थेरपीचा जास्त डोस देण्यात आला, त्यांच्यातील कोलेस्टेरॉलची पातळी दीर्घकाळासाठी घटली. विशेष म्हणजे, या थेरपीच्या मदतीने रुग्णांचे कोलेस्टेरॉल वर्षभर नियंत्रणात राहिल्याचे दिसून आले. रक्तामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यास नसांमध्ये चरबी जमा होते, ज्यामुळे रक्तप्रवाह मंदावतो. रक्तप्रवाह संथ झाल्यामुळे थेट हृदयावरचा ताण वाढतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे कोलेस्टेरॉल वेळेत नियंत्रित करणे अत्यंत आवश्यक आहे.
वैज्ञानिक विश्लेषणातून समोर आले आहे की, ही जीन थेरपी यकृतामध्ये असलेल्या ‘पीसीएसके9’ नावाच्या जनुकाला कायमस्वरूपी बंद करते. हे जनुक शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी कारणीभूत असते. यासाठी प्रगत ‘बेस एडिटिंग’ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. सध्या ही थेरपी तिच्या क्लिनिकल ट्रायलच्या दुसर्या टप्प्यात आहे. बॅड कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे शरीरात पुढील धोके निर्माण होतात. हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज (अडथळा) निर्माण होतात. शास्त्रज्ञांच्या मते, ही थेरपी भविष्यात रुग्णांसाठी वरदान ठरणार असली, तरी सध्या कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्यदायी आहार घेणे आणि नियमित व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे.