लेह : अंतराळ क्षेत्रातील भारताची ताकद आता अधिक वाढणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आपल्या ‘गगनयान’ मोहिमेद्वारे अंतराळात तिरंगा फडकावण्यासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेची सर्वात कठीण तयारी ‘इस्रो’च्या मुख्यालयात नाही, तर लडाखच्या दुर्गम आणि बर्फाळ पहाडांमध्ये सुरू आहे. लडाखमधील गोठवणारी थंडी, विरळ ऑक्सिजन आणि खडकाळ जमीन हे वातावरण एखाद्या दुसर्या ग्रहासारखे (उदा., मंगळ किंवा चंद्र) भासते. ‘इस्रो’ने ‘प्रोटोप्लैनेट’ या खासगी भागीदारासोबत मिळून लडाखची निवड केली आहे. येथे अंतराळवीरांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसून चाचणी घेतली जात आहे.
‘इस्रो’च्या ‘ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटर’ (HSFC) आणि ‘प्रोटोप्लैनेट’ यांनी मिळून ‘मिशन मित्रा’ सुरू केले आहे. या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट पृथ्वीवरच अंतराळसारखे वातावरण निर्माण करून प्रशिक्षण देणे हे आहे. विलग ठिकाणी राहणे, शारीरिक थकवा आणि अत्यंत कमी तापमानात अंतराळवीरांची मानसिक स्थिती आणि त्यांचा ‘टीम वर्क’वर होणारा परिणाम अभ्यासला जात आहे. ‘प्रोटोप्लैनेट’चे संचालक डॉ. सिद्धार्थ पांडे यांच्या मते, आपण अंतराळयानाला जेवढ्या बारकाईने समजून घेतो, तेवढ्याच गांभीर्याने मानवी शरीर आणि मेंदूला समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. यापूर्वी ‘प्रोटोप्लैनेट’ने ‘होप’ (Human Outer Planet Exploration) नावाची मोहीम राबवली होती. यामध्ये ‘अॅनालॉग अॅस्ट्रोनॉटस्’ना एका बंद आणि मर्यादित वातावरणात ठेवण्यात आले होते. प्रदीर्घ अंतराळ प्रवासात मानवी शरीरावर आणि मनावर नेमका काय परिणाम होतो, हे जाणून घेण्यासाठी त्याचा मोठा उपयोग झाला.
गगनयान : भारताची ऐतिहासिक झेप
‘गगनयान’ ही भारताची पहिली मानवरहित आणि त्यानंतर मानवयुक्त अंतराळ मोहीम आहे. भारतीय अंतराळवीरांना पृथ्वीच्या खालच्या (पृष्ठभागापासून जवळच्या) कक्षेत (Low Earth Orbit) सुरक्षितपणे पाठवणे आणि पुन्हा सुखरूप परत आणणे, हे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे, हे अंतराळवीर भारताने बनवलेल्या ‘गगनयान’ या यानातूनच अंतराळात जातील. ही मोहीम यशस्वी झाल्यास, स्वतःचे मानवयुक्त अंतराळ यान प्रक्षेपित करणार्या जगातल्या निवडक देशांच्या गटात भारताचा समावेश होईल. लडाखच्या या ‘स्पेस लॅब’मध्ये तयार होणारे हे ‘गगनवीर’ लवकरच भारताच्या अंतराळ इतिहासात सुवर्णपान लिहिण्यासाठी सज्ज होतील.