टोकियो : जपानमधील फुजी पर्वताच्या पायथ्याशी नारुसावा आईस केव्ह नावाची एक लाव्हा ट्यूब आहे, जी वर्षभर बर्फाच्या स्तंभांनी भरलेली असते. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर तयार होणार्या लाव्हाच्या प्रवाहातून लावा ट्यूब (लावा गुंफा) तयार होते. लाव्हा थंड हवेच्या संपर्कात आल्यावर बाहेरून लवकर कडक होतो, तर आतून गरम आणि द्रव अवस्थेत राहतो. जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक थांबतो, तेव्हा आतला लाव्हा बाहेर वाहून जातो आणि आत पोकळी तयार होते, ज्यामुळे गुहेचे स्वरूप येते. नारुसावा आईस केव्ह आणि इतर अनेक गुंफा इ.स. 864 मध्ये फुजी पर्वताच्या एका भीषण उद्रेकातून तयार झाल्या.
हा उद्रेक फुजी पर्वताच्या मध्यवर्ती शिखरावर न होता, माऊंट नागाओ नावाच्या नवीन छिद्रातून झाला. तो 10 दिवस चालला, ज्यामुळे एक मोठा लाव्हाचा पठार तयार झाला, जो आता ओकिगारा जंगल म्हणून ओळखला जातो. या उद्रेकामुळे एक मोठे तलाव दोन भागांमध्ये विभागले गेले, ज्यामुळे फुजी पर्वतावरील पाच तलावांपैकी दोन तलाव तयार झाले.
नारुसावा आईस केव्ह, फुगाकू विंड केव्ह आणि लेक साई बॅट केव्ह या तीन मोठ्या गुहांपैकी एक आहे. ही गुंफा सुमारे 150 मीटर लांब आणि 3.6 मीटर उंच आहे. येथील तापमान साधारणपणे 3 अंश सेल्सिअस असते, त्यामुळे कोणतीही आर्द्रता लगेच गोठते. हिवाळ्यात आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीला गुहेच्या छतावरून पाण्याचे थेंब गोठून सुमारे 3 मीटर उंच बर्फाचे स्तंभ तयार होतात. त्यामुळे, या गुहेला भेट देण्यासाठी हिवाळा किंवा वसंत ऋतूची सुरुवात हा उत्तम काळ आहे.