हैदराबाद : प्लास्टिकच्या कचर्याची समस्या जगभरातील काही गंभीर समस्यांपैकी एक आहे. प्लास्टिकचे पाण्यात किंवा मातीत लवकर विघटन होत नाही व ते नष्ट होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात. त्यामुळे जमिनीवर किंवा नदी-समुद्रात साठलेला असा कचरा पर्यावरणासाठी तसेच सजीवांसाठी हानिकारक ठरतो. त्यामुळे अशा टाकाऊ प्लास्टिकची विल्हेवाट कशी लावावी, याबाबत सातत्याने संशोधन होत असते. भारतात हैदराबाद येथेही असेच एक संशोधन झाले. येथील सतीशकुमार या मेकॅनिकल इंजिनिअरने संशोधनाद्वारे अशाच प्रकारे प्लास्टिकच्या पुनर्वापराचा एक पर्याय शोधला आहे. टाकाऊ प्लास्टिकपासून इंधननिर्मिती केल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी पुनर्वापरासाठी अनेकदा प्रक्रिया केल्यानंतर आणखी प्रक्रिया न होऊ शकणार्या टाकाऊ प्लास्टिकपासून कृत्रिम इंधन तयार केले आहे.
सतीशकुमार यांच्या म्हणण्यानुसार, या टाकाऊ प्लास्टिकपासून इंधननिर्मितीसाठी केवळ तीन टप्प्यांतील रिव्हर्स इंजिनिअरिंगची प्रक्रिया वापरण्यात आली आहे. यासाठी टाकाऊ प्लास्टिक हे अप्रत्यक्षपणे निर्वात पोकळीत तापवले जाते, त्याला डिपॉलमराईज्ड करून वायुरूपात आल्यानंतर ते पुन्हा घनरूपात आणले जाते. त्यानंतर त्यावर विशिष्ट प्रक्रिया करून द्रवरूपात इंधन म्हणून वापरण्यात येते. कुमार यांनी सांगितले की, अशा प्रकारे टाकाऊ प्लास्टिकपासून इंधननिर्मितीसाठी त्यांनी 2016 मध्ये युनिटची निर्मिती केली. त्यानंतर त्यांनी 50 टन प्लास्टिक संपवले. यासाठी त्यांनी प्रामुख्याने स्वयंसेवी संस्थांनी गोळा केलेले तसेच मोठ्या प्रमाणावर पुनर्वापर केल्यानंतर टाकाऊ प्लास्टिकचा साठा शिल्लक असणार्या कंपन्यांकडून त्यांनी हे प्लास्टिक मिळवले. या इंधननिर्मितीनंतर त्यांनी ते स्थानिक कंपन्यांना 40 ते 50 रुपये प्रतिलिटर या दरात विकले. बेकरी उद्योगांनाही त्यांनी हे इंधन विकले, बेकरी पदार्थ भाजण्यासाठी भट्ट्यांमध्ये या इंधनाला मोठी मागणी आहे.