Energy Boosting Fruits | दिवसभर ऊर्जा टिकवण्यासाठी ‘ही’ फळे उपयुक्त Pudhari
विश्वसंचार

Energy Boosting Fruits | दिवसभर ऊर्जा टिकवण्यासाठी ‘ही’ फळे उपयुक्त

पुढारी वृत्तसेवा

आजकालच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीत थकवा येणे, उत्साहाची कमतरता जाणवणे आणि काम करताना आळस येणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. दिवसभर शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी अनेक जण कॅफिन म्हणजेच चहा-कॉफीचा सहारा घेतात; मात्र यामुळे तात्पुरता ताजेतवानेपणा मिळत असला, तरी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. याऐवजी नैसर्गिकरीत्या शरीराला दिवसभर ऊर्जावान ठेवण्यासाठी फळे हा एक उत्तम पर्याय आहे. फळांमध्ये नैसर्गिक शर्करा, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात, जे शरीराला सतत आणि टिकून राहणारी ऊर्जा देतात. दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी कोणती फळे उपयुक्त ठरतात, याविषयी जाणून घेऊया...

केळी :

ऊर्जेचा विचार केला तर केळी हे सर्वात पहिले आणि उत्तम फळ मानले जाते. केळामध्ये कार्बोहायड्रेटस्‌, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी-६ मुबलक प्रमाणात असते. यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. केळामधील फायबर रक्तातील शर्करेची पातळी अचानक वाढू न देता ती नियंत्रित ठेवते, ज्यामुळे ऊर्जा दीर्घकाळ टिकून राहते.

सफरचंद :

‘‘रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांना दूर ठेवा’’ ही म्हण सर्वांनाच माहीत आहे. सफरचंदात नैसर्गिक शर्करा आणि भरपूर फायबर (विशेषतः पेक्टिन) असते. फायबरमुळे ही शर्करा शरीरात हळूहळू शोषली जाते, ज्यामुळे दिवसभर शरीराला संथ पण सातत्यपूर्ण ऊर्जा मिळत राहते.

संत्री आणि मोसंबी :

संत्री, मोसंबी किंवा लिंबू यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ आणि अँटिऑक्सिडंटस्‌ भरपूर प्रमाणात असतात. हे घटक शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करून थकवा दूर करण्यास मदत करतात. सकाळी किंवा दुपारी ही फळे खाल्याने दिवसभर ताजेतवाने वाटते.

कलिंगड किंवा टरबूज :

अनेकदा शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे (डिहायड्रेशन) थकवा आणि सुस्तपणा येतो. कलिंगड किंवा टरबूजमध्ये तब्बल ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असते. हे फळ शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासोबतच त्यात असलेले व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइटस्‌ शरीरातील ऊर्जेची पातळी टिकवून ठेवतात.

बेरीज् :

स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी किंवा ब्लूबेरी यांसारख्या फळांमध्ये साखरेचे प्रमाण कमी आणि फायबर व अँटिऑक्सिडंटस्‌चे प्रमाण जास्त असते. यातील घटक शरीरातील जळजळ कमी करतात आणि पेशींची ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता वाढवतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT