Catholic Church news Pudhari
विश्वसंचार

Catholic Church news: तामिळनाडूपासून कॅनडाच्या आदिवासी भूमीपर्यंत

आर्चबिशप सुसाई जेसू यांचा विश्वासाचा प्रवास

पुढारी वृत्तसेवा

चेन्नई : दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील एका लहानशा कॅथलिक गावात सुसाई जेसू यांचा धार्मिक प्रवास सुरू झाला. किशोरवयातच ते पहाटे 4.30 वाजता प्रार्थना सभा घेत, शेतकरी कामावर जाण्यापूर्वी गावाला आध्यात्मिक आधार देत. कोअरचे नेतृत्व, मिस्सामधील सेवा आणि पुढे पुरोहित होण्याचे प्रशिक्षण हा प्रवास त्यांना कॅनडापर्यंत नेईल, याची त्यांना तेव्हा कल्पनाही नव्हती.

कॅनडामध्ये त्यांनी आदिवासी कॅथलिक समुदायांमध्ये सेवा करत त्यांच्या भाषा, संस्कृती आणि ऐतिहासिक वेदना समजून घेतल्या. 2022 मध्ये एडमंटन येथे पॅरिशमध्ये पोप फ्रान्सिस यांचे त्यांनी स्वागत केले. त्यावेळी पोप यांनी आदिवासी निवासी शाळांच्या ‌‘विनाशकारी‌’ व्यवस्थेबाबत चर्चची भूमिका मान्य करत माफी मागितली होती. 26 जानेवारीपासून सुसाई जेसू हे उत्तर मॅनिटोबा आणि सस्कॅचवानसाठी आर्चबिशप म्हणून नियुक्त झाले आहेत. टेक्सासपेक्षा मोठ्या प्रदेशात विखुरलेल्या सुमारे 49 हजार, बहुतेक आदिवासी कॅथलिकांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. क्री, डेन, इंग्रजी, फ्रेंच, ओजी-क्री आणि तमिळ भाषेतील प्रार्थना व पारंपरिक ढोलवादनाच्या साक्षीने त्यांचा अभिषेक झाला.

‌‘पहिल्या वर्षी नाती बांधूया,‌’ असे 54 वर्षीय जेसू सांगतात. निवासी शाळांच्या जखमा अजूनही ताज्या असल्याने विश्वास पुन्हा मिळवणे हेच त्यांचे पहिले उद्दिष्ट आहे. भारतात दूरच्या गावांमध्ये पुरोहितांची अनुपस्थिती पाहून लोकांसोबत प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा धडा त्यांनी शिकला होता. हिवाळ्यातील अपघातातून थोडक्यात बचावल्यानंतरही त्यांनी दुर्गम पॅरिशेसना भेटी दिल्या. दारू, अमली पदार्थ, आत्महत्यांच्या वेदनादायक वास्तवाशी सामना करत त्यांनी समुपदेशन व आध्यात्मिकतेत पदव्युत्तर शिक्षण घेतले. उत्तर अमेरिकेतील प्रामुख्याने भारतीय नसलेल्या धर्मप्रांताचे नेतृत्व करणारे ते पहिले भारतीय-जन्माचे बिशप ठरले आहेत. वेदनांमध्ये साथ देत, विश्वास आणि माणुसकी यांचा सेतू बांधणे हाच त्यांच्या सेवेचा केंद्रबिंदू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT