नवी दिल्ली : ‘कोणताही नवीन विचार स्वीकारण्यासाठी एकटे उभे राहण्याचे धैर्य लागते.’ एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचे हे शब्द केवळ सुविचार नसून, त्यांच्या संघर्षाचे सार आहेत. 19 व्या शतकात, जेव्हा महिलांसाठी शिक्षणाची दारे बंद होती, तेव्हा एलिझाबेथ यांनी केवळ वैद्यकीय पदवीच मिळवली नाही, तर भविष्यातील कोट्यवधी महिलांसाठी डॉक्टर होण्याचा मार्गही मोकळा केला. 3 फेब्रुवारी 1821 रोजी इंग्लंडमधील ब्रिस्टल येथे जन्मलेल्या एलिझाबेथ यांचे सुरुवातीचे स्वप्न डॉक्टर होण्याचे नव्हते; त्या एक शिक्षिका होत्या. मात्र, त्यांच्या एका जवळच्या मैत्रिणीने मृत्युशय्येवर असताना म्हटलेले शब्द त्यांच्या मनाला लागले. ती मैत्रीण म्हणाली होती, ‘जर माझ्यावर एखाद्या महिला डॉक्टरने उपचार केले असते, तर कदाचित मला इतका त्रास झाला नसता.’ मैत्रिणीची ही वेदना पाहून एलिझाबेथ यांनी डॉक्टर बनण्याचा ठाम निश्चय केला.
1847 मध्ये एलिझाबेथ यांनी न्यूयॉर्कच्या ‘जेनेव्हा मेडिकल कॉलेज’मध्ये प्रवेशासाठी अर्ज केला. त्याकाळी महिलांना मेडिकलमध्ये प्रवेश मिळणे अशक्य होते. कॉलेज प्रशासनाने हा निर्णय विद्यार्थ्यांच्या मतदानावर सोपवला. विद्यार्थ्यांनी केवळ एक ‘मस्करी’ म्हणून प्रवेशाच्या बाजूने मतदान केले; पण जेव्हा एलिझाबेथ प्रत्यक्ष कॉलेजमध्ये पोहोचल्या, तेव्हा मस्करी करणार्या विद्यार्थ्यांचे डोळे पांढरे झाले. कॉलेजमध्ये एकमेव महिला असल्याने त्यांना पावलोपावली विरोध झाला. मात्र, 1849 मध्ये त्यांनी आपल्या वर्गात प्रथम क्रमांक पटकावून एमडी पदवी मिळवली आणि आधुनिक काळातील जगातील पहिल्या महिला डॉक्टर बनल्या.
पदवी मिळवूनही अमेरिकेत नोकरी न मिळाल्याने त्या लंडनला गेल्या. तिथे एका नवजात बालकावर उपचार करताना त्यांच्या डोळ्यात संसर्ग झाला, ज्यामुळे त्यांनी एका डोळ्याची द़ृष्टी कायमची गमावली. तरीही त्यांनी हार मानली नाही. एलिझाबेथ यांनी 1853 मध्ये आपली बहीण एमिलीसोबत मिळून अमेरिकेत ‘न्यूयॉर्क डिस्पेन्सरी फॉर वुमन अँड चिल्ड्रन’ सुरू केले. गरीब महिला आणि मुलांवर महिला डॉक्टरांनी उपचार करण्याचे हे जगातील पहिले केंद्र होते. पुढे 1867 मध्ये त्यांनी महिलांसाठी वैद्यकीय महाविद्यालयही सुरू केले, जेणेकरून इतर स्त्रियांना भेदभावाशिवाय शिक्षण घेता येईल.