नवी दिल्ली : जेव्हा एखादी व्यक्ती वारंवार जांभई देते, तेव्हा आपण सहसा असा विचार करतो की, तिची झोप पूर्ण झालेली नाही किंवा ती व्यक्ती खूप कंटाळली आहे. परंतु, तुम्हाला माहीत आहे का की गरजेपेक्षा जास्त जांभया येणे हे केवळ थकव्याचे लक्षण नाही? ‘हेल्थलाईनच्या एका अहवालानुसार, जर एखादी व्यक्ती दिवसभरात प्रमाणाबाहेर जांभया घेत असेल, तर ते शरीराच्या आत बळावत असलेल्या एखाद्या गंभीर आजाराचे सुरुवातीचे संकेत असू शकतात.
दिवसभरात काही वेळा जांभई येणे पूर्णपणे सामान्य आहे. याद्वारे आपल्या मेंदूला ताजा ऑक्सिजन मिळताे आणि तो अधिक सतर्क होतो. परंतु, जर तुम्ही दर एक-दोन मिनिटांनी किंवा कोणत्याही कारणाशिवाय सतत जांभया घेत असाल आणि असे अनेक दिवस घडत असेल, तर वैद्यकीय भाषेत याला ‘ॲक्सेसिव्ह यॉर्निंग’ म्हटले जाते.
हेल्थलाईनच्या अहवालानुसार, वारंवार जांभई येण्यामागे या ५ प्रमुख आरोग्य समस्या असू शकतात:
१. स्लीप ॲप्निया : हा झोपेशी संबंधित एक गंभीर आजार आहे, ज्यामध्ये झोपताना वारंवार श्वास थांबतो आणि सुरू होतो. यामुळे रात्री गाढ झोप लागत नाही आणि दिवसा सतत जांभया येतात.
२. हृदयाशी संबंधित समस्या: काही संशोधनानुसार, वारंवार जांभई येण्याचा संबंध हृदयाच्या आरोग्याशी किंवा हृदयविकाराच्या झटक्याशी असू शकतो. शरीरात रक्तदाब आणि ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यावर असे होऊ शकते.
३. मेंदूशी संबंधित आजार: मेंदूतील काही समस्या, जसे की मल्टिपल स्क्लेरोसिस, स्ट्रोक किंवा गाठ यामुळेही जांभयांवरचे नियंत्रण सुटू शकते.
४. औषधांचे दुष्परिणाम: नैराश्य (Depression) किंवा ॲलर्जीवर घेतल्या जाणाऱ्या काही औषधांच्या साईड इफेक्टस्मुळे व्यक्तीला जास्त ग्लानी येते आणि जांभया वाढतात.
५. क्रॉनिक फटीग सिंड्रोम: हा एक असा आजार आहे ज्यामध्ये व्यक्तीला विश्रांती घेतल्यानंतरही सतत प्रचंड थकवा जाणवतो. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे ठरते.