विश्वसंचार

वारंवार दम लागणे असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Pudhari News

लंडन ः दम लागणे किंवा धाप लागणे ही सध्या एक सर्वसामान्य समस्या बनली आहे. वयस्कर लोकांमध्येच नव्हे तर लहान मुलं आणि तरुणांमध्येही ही समस्या दिसत आहे. जीन्याच्या काही पायर्‍या चढताच त्यांना धाप लागते आणि थांबावे लागते. थोडेसे शारीरिक श्रम केल्यावरही श्वास लागतो. ही स्थिती या गोष्टीचे संकेत देते की आपल्या श्वासमार्गात अडथळे येत आहेत आणि आपले शरीर कमजोर होत आहे. सातत्याने दम लागत असेल तर ते गंभीर आजाराचेही लक्षण ठरू शकते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

थोडेसे शारीरिक श्रम केल्यावरही वेगाने श्वासोच्छ्वास होऊ लागणे म्हणजे दम लागणे. अशावेळी माणसाला थकवा येतो व आपली फुफ्फुसे अधिकाधिक ऑक्सिजन मिळवू पाहतात. ही स्थिती त्रासदायक असते. अर्थात अनेकवेळा ती काही काळापुरतीच राहते व थोडी विश्रांती घेतली की ठीक होते. मात्र, काही लोकांमध्ये ती दीर्घकाळ राहते. त्यांना छातीत आखडल्यासारखे किंवा जडपणा आल्यासारखे वाटते. काही लोकांना श्वास घेण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. दम लागला की अनेकांचा जीव घाबरा होतो. श्वसनमार्ग ही एक जटील संरचना आहे. अनेक छोट्या-मोठ्या नलिका बनून ती तयार होते. जर एखाद्या आजारामुळे श्वसनमार्गात बाधा येते त्यावेळी दम लागू शकतो. त्यामागील कारणांमध्ये शरीराची वाढलेली चरबी, हृदयाची समस्या किंवा ट्यूमरसारख्या आजारांचाही समावेश आहे. अशक्तपणा, रक्ताची कमतरता, झोप पूर्ण न होणे, अत्याधिक प्रदूषित ठिकाणी राहणे, अस्थमा (दमा) अशीही अनेक कारणे यामागे असतात. हलक्या मेहनतीनेही दम लागत असेल तर आपली जीवनशैली अतिशय आळशी आहे असाही अर्थ होतो. जर काहीच न करताही दम लागत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याचे कारण म्हणजे हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते व त्याबाबत तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधणे हितावह ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT