मंगळा’वर राहून परतलेले चौघे जण. Pudhari File Photo
विश्वसंचार

वर्षभर ‘मंगळा’वर राहून परतले चौघे जण!

‘नासा’च्या सदस्यांनी एक मोठा टप्पा गाठला

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकन स्पेस एजन्सी ‘नासा’च्या सदस्यांनी एक मोठा टप्पा गाठला आहे. ‘नासा’च्या मंगळ मोहिमेतील क्रू सदस्य वर्षभराच्या प्रवासानंतर त्यांच्या यानातून बाहेर आले. मात्र, या यानाने पृथ्वीवरून उड्डाणच घेतले नव्हते, तर ‘नासा’ने ह्यूस्टनमधील जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये मंगळाच्या वातावरणासारखीच एक राहण्यासाठी जागा तयार केली होती. 12 महिन्यांहून अधिक काळ बाहेरील जगापासून विभक्त राहिल्यानंतर शनिवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास चार क्रू मेंबर्स बाहेर आले. भविष्यात मंगळावर मोहीम पाठवताना येणार्‍या आव्हानांना तोंड देणं हा या मोहिमेचा उद्देश आहे.

या क्रू मेंबर्सनी स्पेस वॉक म्हणजेच ‘मार्सवॉक’देखील केले. याशिवाय त्यांना त्या ठिकाणी गरजेचा असलेला भाजीपालाही पिकवला. केली हॅस्टन, आन्का सेलारिऊ, रॉस ब्राॅकवेल आणि नॅथन जोन्स यांनी 25 जून 2023 रोजी 3 डी-प्रिंडेट राहण्याची सोय असलेल्या या कक्षेत प्रवेश केला. मिशनचे फिजिशियन आणि वैद्यकीय अधिकारी जोन्स म्हणाले की, बंदिवासात असलेले त्यांचे 378 दिवस वेगवेगळ्या संशोधनाने पार पडले. हे चार वैज्ञानिक लाल ग्रहासारख्या म्हणजेच मंगळ ग्रहासारख्या वातावरणात 1,700 चौरस फूट जागेत राहत होते. त्यांना भविष्यात मंगळावरील संभाव्य आव्हानांना सामोरे जावे लागेल. या आव्हानांमध्ये मर्यादित संसाधने, लोकांपासून वेगळे राहणे आणि पृथ्वीशी संपर्कात 22 मिनिटांचा विलंब यांचा समावेश होता.

याशिवाय अशा आणखी दोन मोहिमा आखण्यात आल्याचे ‘नासा’ने म्हटलेय. ‘नासा’च्या म्हणण्यानुसार, क्रू सदस्य अंतराळात राहतील आणि शारीरिक आणि वर्तणुकीशी संबंधित आरोग्य आणि कार्यक्षमतेशी संबंधित घटकांची माहिती गोळा करतील. जॉन्सन स्पेस सेंटरचे डेप्युटी डायरेक्टर स्टीव्ह कॉर्नर म्हणाले, मंगळ ग्रह हेच आमचे उद्दिष्ट आहे. त्यांनी या प्रकल्पाचे वर्णन जागतिक अंतराळ संशोधनाच्या प्रयत्नात अग्रेसर बनण्याच्या अमेरिकेच्या ध्येयाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT