कोलकाता : कोलकाता येथील किशोरवयीन अर्णव डागा याने एका दिवसात कार्ड-स्टॅकिंगचे चार गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड तोडून इतिहास रचला आहे. त्याने 19 ऑक्टोबर 2024 रोजी एका तासात, आठ तासांत, 12 तासांत आणि 24 तासांत कार्डांचे सर्वात उंच घर बनवण्याचा विक्रम केला. यानंतर, इतर तीन विक्रम मोडण्यासाठी डागाने आणखी एक टॉवर तयार केला. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस्ने इन्स्टाग्रामवर म्हटले आहे, ‘कार्ड-स्टॅकिंगची आवड असलेल्या एका भारतीय व्यक्तीने स्वतःला अंतिम आव्हान दिले - चार रेकॉर्ड तोडण्यासाठी 24 तास.’
त्यांनी पुढे म्हटले, ‘अर्णव डागा 19 ऑक्टोबर 2024 रोजी शेकडो कार्डस् आणि एक स्वप्न घेऊन सज्ज झाला... आणि दिवस संपला तेव्हा त्याने एका तासात, आठ तासांत, 12 तासांत आणि 24 तासांत कार्डांचे सर्वात उंच घर बनवण्याचे रेकॉर्ड मिळवले.’ त्यांनी डागाच्या कामगिरीची छायाचित्रे देखील पोस्ट केली. एक तासाचा विक्रम मोडण्याच्या प्रयत्नात त्याने 30 स्तर रचले.
जागतिक विक्रम मोडण्याच्या प्रयत्नात डागा म्हणाला, ‘कार्ड स्टॅकिंग हे नेहमीच माझे पॅशन राहिले आहे आणि मला माझ्या क्षमतेची चाचणी करायची होती. कार्ड स्टॅकिंग हे एक आव्हानात्मक कला आहे ज्याला खूप वेळ आणि संयम आवश्यक आहे.‘पहिला प्रयत्न करून मी खूप थकून गेलो होतो, त्यामुळे मी खूप हळू सुरुवात केली आणि मला खात्री नव्हती की मी ठरवलेले लक्ष्य पूर्ण करू शकेन; पण अंतिमत: मी त्यात यशस्वी ठरलो. या विक्रमाच्या कालावधीत हेडफोन्सवर संगीत ऐकत त्याने आपली एनर्जी कायम ठेवली. उर्वरित तीन विक्रम मोडण्यासाठी अर्णवने 61 स्तरांचा टॉवर तयार केला. तो म्हणाला, ‘विक्रम बनताना पाहण्यापासून ते विक्रम धारक बनण्यापर्यंतचा प्रवास खूप समाधानकारक आहे आणि कार्ड स्टॅकिंगच्या क्षेत्रात गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचे सर्व टायटल स्वतःच्या नावावर करावे अशी माझी इच्छा आहे.’ डागाच्या विक्रम मोडण्याच्या प्रयत्नापूर्वी, आठ आणि 12 तासांत कार्डांचे सर्वात उंच घर बनवण्याचा विक्रम चीनच्या तियान रुईच्या नावावर होता.