वॉशिंग्टन : अंतरिक्षाची दुनिया जितकी आकर्षक आहे, तितकीच आश्चर्यचकित करणारीही आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकन अंतरिक्ष संस्था ‘नासा’ने एक महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे. येत्या काही दिवसांत चार मोठे लघुग्रह पृथ्वीच्या अत्यंत जवळून जाणार आहेत. मात्र,‘नासा’ने स्पष्ट केलं आहे की, यामुळे पृथ्वीला सध्या कोणताही धोका नाही. ‘नासा’च्या अहवालानुसार 23 ते 25 मे 2025 या काळात हे लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहेत.
या लघुग्रहांची नावे व ते कधी व किती अंतरावरून पृथ्वीजवळून जाणार याबाबतचा हा तपशील : 1) 2025 KC- हा लघुग्रह 23 मे म्हणजेच शुक्रवारी पृथ्वीपासून 6.36 लाख किलोमीटर अंतरावरून गेला. त्याचा आकार एखाद्या घराइतका होता. 2) 2025 KL- हा लघुग्रह 24 मे (शनिवारी) पृथ्वीपासून 19.10 लाख किलोमीटर अंतरावरून जाईल. 3) 2003 MH4- हा लघुग्रहही 24 मे म्हणजेच शनिवारी पृथ्वीपासून 41.5 लाख किलोमीटर अंतरावरून जाईल. त्याचा आकार 1,100 फूट म्हणजेच एखाद्या स्टेडियमएवढा असेल. 4) 2025 KM - हा लघुग्रह 25 मे रोजी पृथ्वीपासून 9.6 लाख किलोमीटर अंतरावरून पुढे जाईल. अॅस्टेरॉईड किंवा लघुग्रह हे सूर्याभोवती परिभ—मण करणारे खडकाळ पिंड असतात. हे प्रामुख्याने मंगळ आणि गुरू यांच्यामधील ‘अॅस्टेरॉईड बेल्ट’ मध्ये आढळतात. मात्र, काही वेळा हे पृथ्वीच्या जवळूनही जातात. ‘नासा’ व अन्य जागतिक अंतरिक्ष संस्थांनी अशा लघुग्रहांवर सतत लक्ष ठेवलेलं असतं. कारण जर अशा एखाद्या लघुग्रहाचा पृथ्वीवर आदळण्याचा धोका निर्माण झाला, तर त्याचं आगाऊ भाकीत करून योग्य ती खबरदारी घेता येईल.