वॉशिंग्टन : अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) कडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या गुप्त कागदपत्रांमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. 1960 च्या दशकातील या कागदपत्रांनुसार, अज्ञात उडत्या तबकड्यांमधून (यूएफओ) सुमारे 4 फूट उंचीचे विचित्र जीव बाहेर पडल्याच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे.
काय आहे एफबीआयच्या अहवालात?
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या डिस्क्लोजर मोहिमेचा भाग म्हणून ही कागदपत्रे सार्वजनिक करण्यात आली आहेत. 1966च्या या अंतर्गत मेमोमध्ये 1965 सालातील अनेक घटनांचा उल्लेख आहे. काही साक्षीदारांच्या दाव्यानुसार त्यांनी काही विचित्र जीव पाहिले. ते जीव 3.5 ते 4 फूट उंचीचे होते. त्यांनी
अंतराळवीरांसारखे पोशाख (स्पेस सूट) आणि हेल्मेट घातले होते. साक्षीदारांनी त्यावेळी अज्ञात तंत्रज्ञानाचाही अनुभव घेतला. उडत्या वस्तू अतिशय वेगवान होत्या, पण हवेत एकाच ठिकाणी शांतपणे स्थिर राहू शकत होत्या. त्यांच्यामुळे आजूबाजूच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये बिघाड होत असल्याचेही समोर आले आहे.
उडत्या तबकड्यांचे स्वरूप
लेखक फ्रँक एडवर्डस् यांच्या संदर्भाने या फाईल्समध्ये उडत्या तबकड्यांचे तीन मुख्य प्रकार सांगितले आहेत. त्यामध्ये झेपेलिनच्या आकाराची सुमारे 300 फूट लांब जहाजे. काही फूट ते 100 फुटांपर्यंत व्यास असलेली डिस्कच्या (तबकडी) आकाराच्या वस्तू आणि अलीकडच्या काळात दिसलेले सर्वात जास्त प्रकारच्या उडत्या अंडकृती वस्तू.
धातूचे अवशेष आणि विज्ञाना पलीकडचे पुरावे
अहवालानुसार, कोसळलेल्या काही उडत्या तबकड्यांचे अवशेष हस्तगत करण्यात आले होते. यामध्ये अत्यंत कठीण आणि अज्ञात धातूंचा समावेश होता, ज्यात सूक्ष्म गोलाकार कण आढळले होते. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणाहून हे पदार्थ उड्डाण करत, तेथील जमीन जळालेल्या अवस्थेत आढळली होती.
महत्त्वाचा राजकीय संदर्भ
या फाईल्समध्ये तत्कालीन काँग्रेसमन आणि भविष्यातील राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्ड यांचाही उल्लेख आहे, ज्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. तसेच, हवाई दलाने यावर अभ्यास करण्यासाठी विद्यापीठाच्या मदतीने मोठी रक्कम खर्च केल्याचेही नमूद आहे.
जरी संशोधक याला मोठा पुरावा मानत असले, तरी काही तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. त्यांच्या मते, ही कागदपत्रे केवळ साक्षीदारांच्या अनुभवांवर आधारित आहेत आणि याला अद्याप स्वतंत्र वैज्ञानिक दुजोरा मिळालेला नाही.