तिरुवनंतपूरम : कधी कधी काही जीव आपल्या शरीरात अनाहुत पाहुणे म्हणून येऊन ठाण मांडून बसत असतात आणि आपल्याला त्यांची कल्पनाही नसते. डोळे, कान किंवा नाकात कीटक किंवा तत्सम जीव गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. केरळमध्ये तर 55 वर्षे वयाच्या एका व्यक्तीच्या चक्क फुफ्फुसातून 4 सेंटिमीटर लांबीचे झुरळ बाहेर काढण्यात आले.
या व्यक्तीला श्वास घेण्यास अडचण येत होती. 22 फेब्रुवारीला ही व्यक्ती कोच्चीच्या अमृता हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर आढळले की, त्यांच्या फुफ्फुसात एक झुरळ अडकले आहे. डॉ. टिंकू जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या एका पथकाने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून हे झुरळ बाहेर काढले. हे झुरळ आतच सडू लागले होते व त्यामुळे रुग्णाला श्वास घेता येणे कठीण झाले होते. हे झुरळ बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांना आठ तास लागले.
रुग्णाला आधीच श्वास घेण्याची समस्या होती, त्यामुळे ऑपरेशन अवघड बनले होते. मुळात हे झुरळ रुग्णाच्या फुफ्फुसात गेेलं कसं, हा प्रश्न अनेकांना पडला होता. या रुग्णाला त्याच्या आधीच्या एका समस्येच्या उपचारासाठी घशाच्या मागील भागात नळी लावली होती. या नळीतून हे झुरळ आत शिरले होते! आता मात्र हा रुग्ण बरा झाला असून, त्याला घरीही सोडण्यात आले आहे.