लिमा : वैज्ञानिकांनी पेरू देशात एका विशाल डॉल्फिनच्या कवटीचे जीवाश्म शोधले आहे. ही प्रजाती 1.6 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. पेरूच्या अमेजोनियन नद्यांमध्ये हे डॉल्फिन अस्तित्वात होते. या लुप्त झालेल्या प्रजातीची लांबी 3.5 मीटर होती. नदीत आढळणार्या डॉल्फिनमध्ये ही सर्वाधिक लांबीची प्रजाती आहे. या नव्या प्रजातीला 'पेबनिस्टा याकुरुना' असे नाव देण्यात आले आहे.
संशोधक एल्डो बेनिटस्-पालोमिनो यांनी सांगितले की, डॉल्फिनच्या प्लॅटेनिस्टोइडिया कुळाशी हे डॉल्फिन संबंधित आहेत. या कुळातील डॉल्फिन 2.4 कोटी ते 1.6 कोटी वर्षांपूर्वी महासागरांमध्ये आढळत होते. नव्या अन्नाच्या शोधात त्यापैकी डॉल्फिननी महासागर सोडून नद्यांमध्ये आश्रय घेतला. नद्या हा त्यांच्यासाठी एक अधिक सुरक्षित आसराही होता. भारतात गंगा नदीमध्येही डॉल्फिन आढळतात. ही प्राचीन प्रजाती या डॉल्फिनचीही नातेवाईक आहे. गंगेतील डॉल्फिनही आता लुप्त होण्याच्या धोक्याचा सामना करत आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे; अन्यथा या प्राचीन डॉल्फिनप्रमाणेच हे डॉल्फिनही लुप्त होऊ शकतात.