विश्वसंचार

Animal fossils : तब्बल 23 कोटी वर्षांपूर्वीच्या प्राण्याचे जीवाश्म

Arun Patil

रिओ डी जनैरो : संशोधकांनी दक्षिण ब्राझीलमध्ये तब्बल 23 कोटी वर्षांपूर्वीच्या एका अनोख्या प्राण्याचे जीवाश्म (Animal fossils) शोधून काढले आहे. या प्रागैतिहासिक काळातील सरीसृपाचे हात अतिशय लांब आणि मजबूत होते तसेच त्याचे पंजे एखाद्या तलवारीसारखे तीक्ष्ण नखांचे होते. ब्राझीलच्या सांता मारिया येथील फेडरल युनिव्हर्सिटीतील पॅलियोंटोलॉजिस्ट रॉड्रिगो म्युलर यांनी सांगितले की या पंज्यांचा आणि हातांचा वापर तो शिकार पकडण्यासाठी किंवा झाडावर चढण्यासाठी करीत असावा.

दक्षिण ब्राझीलच्या रियो ग्रँडे डो सुल राज्यातील भाताच्या शेतात म्युलर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी उत्खनन करून या प्राण्याचे जीवाश्म शोधले. (Animal fossils)  252 दशलक्ष ते 201 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या 'ट्रायासिक' काळात हा विचित्र प्राणी वावरत होता. त्याचे हे जीवाश्म सुमारे 23 कोटी वर्षांपूर्वीचे असावे असे संशोधकांना वाटते. या प्राण्याचे तोंड लांब व तीक्ष्ण चोचीसारखे होते जे कदाचित कीटकांच्या शरीरात घुसवण्यासाठी उपयुक्त ठरे.

फळे व सरड्यासारखे लहान प्राणी पकडण्यासाठीही त्याची ही चोच उपयुक्त होती. त्याचे पंजे कदाचित झाडावर चढण्यासाठी तसेच भक्ष्याला पकडून ठेवण्यासाठी उपयोगी पडत. या प्रजातीला संशोधकांनी 'वेनेटोरॅप्टर गॅसेनी' असे नाव दिले आहे. त्याच्या जीवाश्माचा अभ्यास करून संशोधकांनी अंदाज लावला आहे की या प्राण्याची उंची 27.5 इंच असावी व तो 39 इंच लांबीचा असावा. त्याच्या हाडांवरून असे दिसते की तो एक पूर्ण वाढ झालेला प्रौढ प्राणी होता. त्याच्या शरीरावर पिसांसारखी मुलायम फर होती व त्याची शेपूटही लांब होती.

-हेही वाचा

SCROLL FOR NEXT