लंडन : एका संग्रहालयात तब्बल एका शतकाहून अधिक काळ पडून असलेले जीवाश्म प्रत्यक्षात शिकारी डायनासोरची एक संपूर्ण नवीन प्रजाती असल्याचे संशोधकांनी शोधून काढले आहे. या शोधामुळे ‘क्रिटेशियस’ काळातील काही सर्वात धोकादायक शिकारी संपूर्ण जगात कसे पसरले, याबद्दलच्या प्रदीर्घ कोड्याची उकल करण्यास शास्त्रज्ञांना मदत होऊ शकते.
हा डायनासोर सुमारे १२ कोटी वर्षांपूर्वी दक्षिण इंग्लंडमधील सध्याच्या ‘आयल ऑफ वाइट’ भागात राहत होता. तो ‘मेगाराप्टर’ नावाच्या दोन पायांवर चालणाऱ्या मांसाहारी प्राण्यांच्या समूहातील होता, ज्यांचा संबंध ‘टायरानोसॉरस’ प्रजातीशी आहे. मात्र, टायरानोसॉरसच्या उलट मेगाराप्टर आपल्या भक्ष्यावर हल्ला करण्यासाठी आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी शक्तिशाली हात आणि मोठ्या वळणदार नख्यांचा वापर करत असत. ‘रॉयल सोसायटी ओपन सायन्स’ या नियतकालिकात १४ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या अभ्यासात या नवीन प्रजातीचे वर्णन करण्यात आले आहे. युरोपमध्ये ओळखला गेलेला हा पहिलाच मेगाराप्टर आहे. ज्यामुळे या समूहाच्या उत्क्रांतीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दुवा समोर आला आहे.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील पृथ्वी विज्ञान विभागाचे संशोधक आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक कॅशियस मॉरिसन यांनी सांगितले, 'हे जीवाश्म जवळपास १०० वर्षे ड्रॉवरमध्ये पडून राहिले आणि त्याकडे दुर्लक्ष झाले, हे खरोखरच एक गूढ आहे. ‘आयल ऑफ वाइट’वर अनेक हाडे सापडतात, अजून काय काय शोधले जाण्याची वाट पाहत आहे, कोणाला ठाऊक!' या मेगाराप्टरचा शोध १९२४ मध्ये सुरू झाला, जेव्हा एका हौशी जीवाश्म संग्राहकाला ‘आयल ऑफ वाइट’ येथे डायनासोरच्या कवटीचा एक तुकडा सापडला. हा नमुना कालांतराने लंडनच्या ‘नॅशनल हिस्ट्री म्युझियम’च्या संग्रहात जमा झाला, परंतु नंतर तो पूर्णपणे विस्मरणात गेला होता.