लंडन : बिटनच्या ज्युरासिक कोस्टवर सापडलेला जवळजवळ संपूर्ण जीवाश्म सांगाडा एका नवीन, प्राचीन सागरी सरिसृप प्राण्याच्या प्रजातीचे प्रतिनिधित्व करतो. हा प्राणी डायनासोरच्या काळात पृथ्वीवर अस्तित्वात होता. या इक्थिओसॉरला (Ichthyosaur) ‘झीफोड्रेकॉन गोल्डनकॅप्सिस’ (Xiphodracon goldencapsis) असे नाव देण्यात आले आहे. पेपर्स इन पॅलेऑन्टोलॉजी नावाच्या जर्नलमध्ये शुक्रवारी (ऑक्टोबर 10) प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, हा प्राणी जिवंत असताना अंदाजे 10 फूट (3 मीटर) लांब असावा. या प्राण्याच्या डोळ्यांची खोबणी मोठी होती आणि तलवारीच्या आकाराचे लांब, निमुळते तोंड होते.
हे जीवाश्म प्रारंभिक जुरासिक युगातील प्लिन्सबॅचियन (Pliensbachian) नावाच्या कालखंडातील आहे. हा कालखंड सुमारे 193 दशलक्ष ते 184 दशलक्ष वर्षांपूर्वी होता. अभ्यासानुसार, या कालखंडातील इक्थिओसॉरच्या जीवाश्माचा अभ्यास केल्याने शास्त्रज्ञांना या सागरी प्राण्यांच्या उत्क्रांतीतील एका महत्त्वपूर्ण टप्प्याबद्दल अधिक माहिती मिळू शकेल. जीवाश्म संग्राहक क्रिस मूर यांनी 2001 मध्ये डॉर्सेट येथील जुरासिक कोस्टवरील समुद्राच्या 96 मैल (154 किलोमीटर) लांबीच्या पट्ट्यात हे अवशेष शोधले. हा भाग जीवाश्मांचा खजिना मानला जातो. मूर यांनी त्यानंतर लगेचच हे जीवाश्म कॅनडातील रॉयल ऑन्टारियो म्युझियमला विकले.
त्याला इक्थिओसॉर म्हणून ओळखले गेले असले तरी, अलीकडेपर्यंत त्याचा तपशीलवार अभ्यास झाला नव्हता. युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर आणि युनिव्हर्सिटी ऑफ बिस्टल येथील पॅलेऑन्टोलॉजिस्ट आणि या अभ्यासाचे सह-लेखक डीन लोमॅक्स यांनी एका निवेदनात सांगितले की, ‘2016 मध्ये जेव्हा मी हा सांगाडा पहिल्यांदा पाहिला, तेव्हा तो मला असामान्य वाटला होता. पण प्लिन्सबॅचियन कालखंडातील गुंतागुंतीच्या जीवसृष्टीतील बदलांना समजून घेण्याच्या आमच्या प्रवासात तो इतकी महत्त्वाची भूमिका बजावेल, याची मला अपेक्षा नव्हती.’ या नव्या वंशाचे नाव झीफोड्रेकॉन (Xiphodracon) हे फाइल फोटो ग्रीक शब्द ‘झीफोस’ (अर्थ: तलवार) आणि ‘ड्रेकॉन’ (अर्थ: ड्रॅगन) यावरून आले आहे. इक्थिओसॉरला ‘समुद्री ड्रॅगन’ असेही उपनाव आहे, त्याचा संदर्भ या नावात आहे. प्रजातीचे नाव ‘गोल्डनकॅप्सिस’ (goldencapsis) जुरासिक कोस्टवरील ‘गोल्डन कॅप’ या ठिकाणावरून आले आहे, जिथे हा इक्थिओसॉर सापडला होता.