लंडन; पुढारी वृत्तसेवा : Fossil Brain संशोधकांनी आतापर्यंत कधीही पाहण्यात न आलेल्या जीवाश्मभूत मेंदू चा शोध लावला आहे.
हे मेंदूचे जीवाश्म तब्बल 31 कोटी वर्षांपूर्वीचे असून ते 'हॉर्सशू क्रॅब' प्रजातीच्या खेकड्याचे आहे. त्यावरून प्रागैतिहासिक काळापासून जीवांचा कसा विकास झाला याच्या अभ्यासावर नवा प्रकाश पडू शकतो.
हे मेंदूचे जीवाश्म 'युप्रुप्स डॅनी' या लुप्त झालेल्या प्रजातीच्या खेकड्याचे आहे. इलिनॉईसमधील मेझॉन क्रीक येथे हे जीवाश्म सापडले. एखाद्या प्राण्याच्या नाजूक, मऊ ऊतींचे जतन करण्यासाठी तेथील स्थिती नैसर्गिकरीत्याच अनुकूल आहे.
त्यामुळे हे जीवाश्मही अतिप्राचीन असूनही तुलनेने चांगल्या स्थितीत आहे. सध्याच्या हॉर्सशू खेकड्यांच्या चार प्रजाती आहेत. या सर्वांमध्ये कठीण बाह्यावरण असते.
त्यांचे डोके घोड्याच्या नालेच्या म्हणजेच इंग्रजी 'यू' आकाराचे असते व त्यांना दहा पाय असतात.
या जीवांचा समावेश 'खेकडा' म्हणून होत असला तरी वास्तवात ते विंचू किंवा कोळ्याशी अधिक जवळचे आहेत.
अशा हॉर्सशू क्रॅब्सची अनेक जीवाश्मे आतापर्यंत मिळालेली आहेत. मात्र, कोट्यवधी वर्षांपूर्वीच्या खेकड्याच्या मेंदूचे जीवाश्म आतापर्यंत सापडलेले नव्हते.
मैनेमधील न्यू इंग्लंड युनिव्हर्सिटीच्या रसेल बिकनेल या पॅलिओंटोलॉजिस्टनी सांगितले की जीवाश्मभूत हॉर्सशू क्रॅबच्या मेंदूचा हा पहिला आणि एकमेव पुरावा आहे.